सोलापूर : एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजना आणत लोकप्रियता मिळवायची आणि दुसरीकडे त्यांना सुरक्षा देण्यात कमी पडायचे हे सध्याच्या शासनाचे धोरण आहे. महिन्याकाठी दीड हजार रुपयांपेक्षाही त्यांना संरक्षण हवे आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे बोलताना केली.

विधानसभा निवडणुकीत माढा, करमाळा आणि मोहोळ या तिन्ही जागांवरील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पवार यांच्या जाहीर सभा झाल्या. त्यावेळी त्यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका

टेंभुर्णी येथील जाहीर सभेत बोलताना पवार म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर आहे. यंदा सोयाबीनचे पीक सोन्यासारखे उगवले. परंतु अतिवृष्टीमुळे आणि बाजारात भाव पडल्याने शेतकरी हताश झाला आहे. संकटकाळात शेतकऱ्यांना आधार देण्याचे कर्तव्य सरकार विसरल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, अशी टीका पवार यांनी केली.
शिंदे बंधूंना मीच मदत केली

माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे बंधू करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे या दोघांचा पवार यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला. या दोघांना साखर कारखाने काढण्यासाठी, अन्य संस्था उभारण्यासाठी आपण भरपूर मदत केली. त्यांनी लोकहितापेक्षा स्वहित पाहिले. नंतर संकटकाळी दोघे शिंदे बंधू आपली साथ सोडून गेले. त्यांनी विश्वास गमावला. आमची सत्ता होती, तोवर सोबत राहिले. सत्ता गेल्यावर यांनी भ्रष्टाचार केलेला असल्यामुळे हे दोघेही ईडीची नोटीस आल्यामुळे घाबरून निघून गेले. हे बबनराव शिंदे माझ्याकडे चार-पाचवेळा हात जोडत आले. परंतु यापुढे त्यांना कधीही मदत करायची नाही. माढ्यात अभिजित पाटील आणि करमाळ्यात नारायण पाटील यांना साथ देऊन शिंदे बंधूंचा निकाल लावा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा : Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप

शरद पवारांचा नाद करायचा नाही – शरद पवार

अनेक वर्षे सर्व प्रकारे मदत करूनही संकट काळात साथ देण्याऐवजी पळून गेलेले माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे आणि त्यांचे बंधू करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांचा एवढा मोठा पराभव करा की त्यातून महाराष्ट्राला संदेश गेला पाहिजे. सर्वांचा नाद करायचा, पण शरद पवारांचा नाही. आमचा नाद करणाऱ्यांची जागा दाखवून द्या, अशा शब्दांत शरद पवार यांनी शिंदे बंधुंचा समाचार घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी मोहोळचे आपली साथ सोडून गेलेले माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. राजन पाटील यांनी स्वतःच्या गावात अप्पर तहसील कार्यालय आणताना केवळ स्वतःचा फायदा पाहिला आणि जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. त्याची किंमत विधानसभा निवडणुकीत जनताच वसूल करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.