सोलापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा करमाळा तालुक्यातील वांगी येथे पार पडली. कायद्याचे उल्लंघन करून पहाटे चार वाजता सभा घेण्यात आली होती. परंतु याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही आणि संबंधितांवर गुन्हा दाखल केला नाही. यासंदर्भात करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्याशी संपर्क साधला असता काहीही बोलण्यास नकार देत त्यांनी कानावर हात ठेवले.
जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण प्रश्नावर दुसऱ्यांदा आरंभलेले आमरण उपोषण शासनाला आणखी मुदत देत मागे घेतले. त्यानंतर त्यांनी राज्यभर दौरा काढून जाहीर सभांचा झंझावात सुरू केला आहे. त्यांची जाहीर सभा करमाळा तालुक्यातील वांगी (क्र. १) येथे पहाटे चार वाजता झाली. तत्पूर्वी, शेजारच्या धाराशिव जिल्ह्यात परांडा येथेही मध्यरात्री त्यांची सभा झाली. वास्तविक पाहता रात्री दहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी जाहीर सभा घेण्यास आणि ध्वनिक्षेपण यंत्रणेसह वाद्ये वाजविण्यास आणि फटाके फोडण्यास ध्वनिप्रदूषण विरोधी कायद्यानुसार पूर्णतः बंदी आहे. या कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्याही सूचना आहेत.
हेही वाचा : “…म्हणून छगन भुजबळ समाजांमध्ये भांडणं लावण्याचं पाप करतायत”, संभाजीराजे छत्रपतींचा आरोप
तथापि, मनोज जरांगे-पाटील यांच्या जाहीर सभा रात्री दहावाजेनंतरच झाल्या. परांडा (जि. धाराशिव) येथे मध्यरात्री तर करमाळ्याजवळ पहाटे चार वाजता जरांगे यांची सभा झाली. दोन्ही सभांसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात होता. करमाळ्याजवळ वांगी येथे पहाटे चार वाजता थंडीच्या कडाक्यात झालेल्या जाहीर सभेप्रसंगी तेथील पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील व करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हे स्वतः हजर होते. परंतु कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसत असूनही पोलिसांनी कोणत्याही प्रकारे कायदेशीर हस्तक्षेप केला नाही. सभेनंतर दिवसभरातही याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही.
हेही वाचा : “मराठा आरक्षणाशिवाय सुट्टी नाही”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
पोलिसांनी ठेवले कानावर हात
करमाळा तालुक्यात वांगी येथे पहाटे चार वाजता मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा झाली. परंतु याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात सभेचे संयोजक व इतरांवर कायदेशीर गुन्हा दाखल झाला नाही. याबद्दल आपण भाष्य करू इच्छित नाही. – ज्योतीराम गुंजवटे, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे</p>