|| प्रल्हाद बोरसे

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची अवस्था केवीलवाणी

मालेगाव : शिवसेना आणि छगन भुजबळ यांचे मधल्या काळातील विळ्या-भोपळ्याचे नाते जगजाहीर होते. नंतर उभयतांनी जमवून घेतले. तरीही अढी अद्यापही दूर झालेली नसली तरी मालेगाव तालुक्यातील शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन भुजबळांच्या हस्ते झाल्याने तालुक्यात शिवसेनेची दोन हात करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अवस्था फारच के वीलवाणी झाली.

मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे नुकताच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा  पार पडला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झालेल्या या पुतळा अनावरण सोहळ्यास कृषिमंत्री दादा भुसे, शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील, शिवशाहीर विजय तनपुरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्याला जोडूनच शिवसेनेतर्फे खाकुर्डी येथे सुरू करण्यात आलेल्या काटवन विभाग मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भुजबळ यांच्या हस्ते सेना कार्यालयाचे उद्घाटन झाले. राज्याच्या राजकारणात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित सत्तेत असले तरी अशा पद्धतीने एखाद्या वरिष्ठ नेत्याने थेट मित्र पक्षाच्या कार्यालयाचे आपल्या हस्ते उद्घाटन करण्याची बाब दुर्मीळ असल्यामुळे भुजबळ यांच्या या कृतीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राज्यातील सत्तेचा लाभ केवळ शिवसेनेला होत असल्याने तसेच लोकांची कामे होत नसल्याने जनतेच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याची राष्ट्रवादीची तक्रार आहे. ही बाब पक्ष हिताच्या दृष्टीने कशी बाधक ठरू शकते,याचे चित्र स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडण्याचा वेळोवेळी प्रयत्न के ला. याशिवाय शिवसेनेमुळे पक्षाची फरफट होत असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा आग्रहदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरून धरला जात आहे.

असे असले तरी शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन भुजबळांच्या हस्ते झाल्याने  राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.