कोल्हापूर : शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, कोल्हापूर-सांगली महामार्गाचे रखडलेले काम तत्काळ पूर्ण करावे, या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने हातकणंगले येथे निदर्शने करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्याकडे निवेदन सादर करून राज्य शासनाच्या उदासीन कारभाराविरोधात निषेध नोंदविण्यात आला.

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावालाही नागरिक, शेतकरी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवत आहेत. सुमारे ८६ हजार कोटी रुपये खर्चाच्या या गरज नसलेल्या महामार्गामुळे शेती, पर्यावरण, वनसंपदा, गावांचे जीवनमान धोक्यात येणार आहे. त्यामुळेच शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध दर्शवला असून, तो पुढेदेखील राहील, असा इशारा चौगुले यांनी दिला. सन २०१४ ते २०१९ या काळात चंद्रकांत पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते असूनदेखील हा रस्ता पूर्ण होऊ शकला नाही. कोणतीही योजना पूर्ण करण्याची क्षमता नसताना फक्त नव्या घोषणा करून जनतेला फसवणे हाच उद्योग या फसव्या भाजप शासनाने सुरू केला आहे, अशी टीका या वेळी करण्यात आली.

माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, पिंटू मुरूमकर, अनिल खवरे, युवा सेना जिल्हाप्रमुख स्वप्निल मगदुम, बाबासाहेब शिंगे, देवाशिष भोजे यांच्यासह शिवसैनिक, युवा सैनिक उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.