सांगली : इस्लामपूरचे नामकरण उरूण ईश्वरपूर करण्याबाबतची अधिसूचना मंगळवारी शासनाने प्रसिद्ध करताच शहरात जल्लोष करण्यात आला. ग्रामदैवत संभूआप्पाचा उरूस सुरू असताना शहराचे नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाने अधिसूचित केल्याने वेगळाच आनंद शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे. इस्लामपूर शहराचे नामांतर ईश्वरपूर करण्याची बऱ्याच वर्षांची मागणी होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहरात झालेल्या जाहीर सभेत पहिल्यांदा ईश्वरपूर असा जाहीर उल्लेख केल्यानंतर या मागणीने जोर धरला होता. नगरपालिकेच्या सभागृहातही ईश्वरपूर नामांतर करावे, असा ठराव करण्यात आला होता. पावसाळी अधिवेशनात आमदार सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत आणि छगन भुजबळ यांनी विधानसभेत इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करण्याची घोषणा केली होती.

नामांतराचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव केंद्र शासनाने मंजूर केल्यानंतर आज याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली. यानुसार इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर आणि नगरपालिकेचे नाव उरूण ईश्वरपूर असे करण्यात आले आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत घोषणा केली. शहरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शहरवासीयांची बऱ्याच दिवसांची मागणी शासनाने मान्य केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी शासनाचे आभार मानले आहेत. तर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद पवार यांनीही शासनाचे आभार मानले आहेत.