महाड दुर्घटनेला वर्ष लोटले तरीही..

ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न कायम

ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न कायम

गेल्या वर्षी तब्बल ४२ जणांचे जीव घेणाऱ्या महाड पूल दुर्घटनेनंतर ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षांने समोर आला होता.  सावित्री नदीवर दहा महिन्यांत नव्या पुलाची उभारणी झाली असली तरी मुंबई- गोवा महमार्गावरील १३ लहान आणि दोन मोठे ब्रिटिशकालीन पूल दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. या पुलांची दुरूस्ती न केल्यास भविष्यकाळात दुर्घटना घडू शकतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेला आज, बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी २ ऑगस्टला महाड परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला होता. त्यात दोन एसटी बस आणि एक टव्हेरा गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. यात ४२ जणांचा मृत्यू झाला होता.  सावित्री पूल दुर्घटनेची दखल घेऊन भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी याच ठिकाणी सहा महिन्यांत नवीन पूल बांधण्याची घोषणा केली. आणि जवळपास १० महिन्यांत पुलाचे काम पूर्णही झाले. जून महिन्यात नवीन पुलाचे लोकार्पणही करण्यात आले.

महामार्गावर पनवेल ते महाड उपविभागात १३ लहान ब्रिटिशकालीन पूल आहेत. तर काळ आणि गांधारी नदीवर मोठे ब्रिटिशकालीन पूल आहेत. ९१ मीटर लांबीच्या मेसनरी आर्च पद्धतीच्या काळ नदीवरील पुलाची निर्मिती १८७१ मध्ये करण्यात आली आहे. तर ६३ मीटर लांबीच्या मेसनरी आर्च पद्धतीच्या गांधारी नदीवरील पुलाची निर्मिती १९४५ साली करण्यात आली आहे. या पुलांवरून आजही अवजड वाहतूक सुरूच आहे. कोलाडजवळ कुंडलिका नदीवर, तर पालीजवळ आंबा नदीवर जुने पूल अस्तित्वात आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र पळस्पे ते इंदापूरदरम्यान नवीन पुलांची बहुतांश कामे गेल्या सहा वर्षांपासून सध्या रखडली आहे. पेण तालुक्यातील भोगावती नदीवरचा पूल सोडला तर एकाही पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. महाड दुर्घटनेतून बोध घेऊन महामार्गावरील जीर्ण पुलांच्या जागी नवीन पुलांची कामे तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. तर ज्या ठिकाणी नवी पुलांची कामे सुरू आहेत. तीदेखील लवकर मार्गी लावणे अपेक्षित आहे.

शंभर वर्षे जुन्या असलेल्या ब्रिटिश पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करीत बसण्यापेक्षा आता सरकारने नवीन पुलांची कामे तातडीने हाती घ्यावी, पूल तुटण्याची वाट पाहू नये, महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम होईल तेव्हा होईल पण पूल उभारणीची कामे सुरू करावीत.   माणिक जगताप, माजी आमदार 

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम लवकरच सुरू होणार आहे. यात जुन्या पुलांच्या जागेवर नवीन सहा पदरी पुलांचे बांधकाम केले जाणार आहे. पुलांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पावसाळ्यानंतर ही कामे सुरू होणे अपेक्षित आहे.  एस. के. सुरवसे, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण

महाड दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारच्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने स्वतंत्र यंत्रणा नेमून मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व जुन्या पुलांची पाहणी केली आहे. आणि काही सूचना केल्या आहेत. त्यावर कार्यवाही सुरू आहे.  एस. के. फेगडे, समन्वयक राष्ट्रीय महामार्ग, पेण

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi articles on mahad bridge collapse incident