उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असं संजय राऊत यांनी म्हटलंं होतं. पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहेत. मात्र, २०२४ कोण होईल यापेक्षा विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे हे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांच्या विधानानंतर मनसेने त्यांची खिल्ली उडवत एक खोचक ट्विट केलं आहे. मज्जा आहे बुवा एका माणसाची असं ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. या ट्विटची बरीच चर्चा सोशल मीडियावर होते आहे. एवढंच नाही तर ठाण्यात गारांचा पाऊस झालाय. तसंच राज्यातल्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी आहे. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्याला रडवलं आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात काय काय घडामोडी घडतात? इतर काय गोष्टींचे अपडेट्स येतात हे जाणून घेण्यासाठी वाचा आमचा हा लाइव्ह ब्लॉग. जाणून घ्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या अपडेट्स
यवतमाळ : वणी तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली. तालुक्यातील वडगाव टीप आणि पाकळगाव (झरपट) येथे होळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनांनी तालुक्यात हळहळ व्यकत होत आहे.
डोंबिवली- मागील वर्षभराच्या कालावधीत मुंबई, डोंबिवली, ठाणे परिसरात दिवसा-रात्री एकूण ३७ घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांच्या विशेष पथकाने मुंब्रा येथून रविवारी अटक केली. त्यांच्याकडून २२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी कुटुंबियांसोबत धुळवड साजरा केली. यावेळी त्यांनी नातू रुद्रांशकडून रंग लावून घेत सणाचा आनंद द्विगुणित केला. शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी, शिंदे यांची सुरक्षा पाहणारे पोलीस कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते. सविस्तर वाचा…
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. याच पावसाचा फटका आता निफाड तालुक्यातील उगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पानगव्हाणे यांना बसला आहे. त्यांची अक्षरश: दोन एकर द्राक्ष बाग ही आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जमीनदोस्त झाली. या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टाने या शेतकऱ्याने द्राक्ष बाग जगवली. मात्र आलेल्या वादळी पावसाने या द्राक्षबाग भुईसपाट झाली आणि शेतकऱ्याला आर्थिक कोंडीत सापडला आहे.
ताडदेव येथील अंध मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मंगळवारी अन्नातून विषबाधा झाली असून काही मुलांना उलट्या, तर काही मुलांच्या पोटात दुखू लागले होते. त्यामुळे सात विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी दोघांना तापही येत आहे. सविस्तर वाचा…
चोपडा शहरासह तालुक्यात सोमवारी संध्याकाळी अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची धावपळ झाली. मात्र शेतातील उभे असलेले पीक या वादळामुळे जमिनीवर आडवे पडले असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतातील पीक डोळे समोर आडवे पडलेले पाहून शेतासाठी लागलेला खर्च कसा निघेल या संकटात सापडला आहे. तर काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना मालमत्ता जप्तीची नोटीस आल्याने तीच चिंता असताना निसर्गाने या वादळामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतातून निघणाऱ्या या उत्पन्नातून कर्ज फेडले गेले असते, कर्ज नाही तर कमीत कमी त्या कर्जावरील व्याज तरी फेडले गेले असते, अशी व्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकरी करीत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांनी उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. भोईर यांनी उत्पन्नापेक्षा ४४९ टक्के अधिक मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एसीबीने शोध मोहिमही राबवली. सविस्तर वाचा…
साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाला लागून असलेल्या खासदार उदयनराजेंच्या मालकीच्या इमारतीवर उदयनराजेंचे भित्तीचित्र (वॉलपेंटिंग) रेखाटण्यावरून साताऱ्यात पोवई नाक्यावर तणावाचे वातावरण झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी कुटुंबियांसोबत धुळवड साजरा केली. यावेळी त्यांनी नातू रुद्रांशकडून रंग लावून घेत सणाचा आनंद द्विगुणित केला. शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी, शिंदे यांची सुरक्षा पाहणारे पोलीस कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते. सविस्तर वाचा…
कल्याण- सोमवारी संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे कल्याण, डोंबिवली शहरांच्या अनेक भागात झाडे उन्मळुन पडली. काही ठिकाणी रस्त्यांवर लावण्यात आलेल्या कमानी कोसळल्या. जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.
येथील पूर्व भागातील आयरे गाव, कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातील ४४ एकर जमिनीवरील हरितपट्ट्यात बेकायदा चाळी, बेकायदा १४ इमारती उभारणाऱ्या माफियांना कारवाईच्या नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, सविस्तर वाचा…
कल्याण डोंबिवली पालिकेतील २२०० सफाई कामगारांपैकी १५८ सफाई कामगार पालिकेच्या १० प्रभाग कार्यालयात शिपाई, फेरीवाला हटाव पथकात काम करतात. काही कामगार पालिका मुख्यालयात विविध अधिकाऱ्यांच्या दालनात शिपाई म्हणून काम करतात.
वाई : साताऱ्यातील मटका आणि खाजगी सावकारीद्वारे समाज व्यवस्था बिघडवणार्या मटकाकिंग समीर कच्छीसह त्याच्या ४६ साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त मुरगुड येथे काल बैलगाडी शर्यत पार पडली. या शर्यती दरम्यान तीन ते चार अपघाताच्या घटना घडल्यात. यामध्ये पाच जण किरकोळ जखमी झालेत. यातील काही अपघात मोबाईल कॅमेऱ्यात देखील कैद झालेत. एका अपघातामध्ये बैलगाड्यातून चालक फरपटत जात असल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भरधाव बैलगाडी प्रेक्षकांमध्ये आल्यानं तीन ते चार प्रेक्षकांच्या अंगावरून ही बैलगाडी गेली. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी नाही बैलगाडी शर्यत झाली असली तरी यामध्ये घडलेल्या तीन ते चार अपघाताच्या घटनांमुळे ही बैलगाडा शर्यत चांगलीचं चर्चेत आली आहे.
परंडा तालुक्यातील खसापुरी हे गाव न्यायालयाच्या निकालामुळे उध्वस्त झाले. पालकमंत्र्यांनी त्यांना स्थलांतरीत करत पत्र्याच्या झोपड्या केल्या मात्र वादळवाऱ्याने आत्तापर्यंत ३ते ४ वेळा पत्रे उडाले. काल होळीच्या सणादिवशी पुन्हा वादळवारे आल्याने ७० ते ८o कुंटूब पुन्हा उघड्यावर आले असुन त्या वादळात पत्रे उडाल्याने किरकोळ जखमा झाल्या मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. खासापुरी सरपंच व काही नागरिकांच्या मदतीने हे स्थलांतरीत नागरिक रात्री ११ च्या सुमारास तहासिल कार्यालयात आश्रयाला आले. कायमस्वरूपी स्थलांतर व्यवस्था होईपर्यंत चांगल्या ठिकाणी शासनाने शासकीय इमारत किंवा भाड्याने इमारत घेऊन व्यवस्था करावी. अन्यथा, आत्मदहनाशिवाय पर्याय नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तर फोन करूनही आपत्ती व्यवस्थापन, तालुका समिती न आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
चंद्रपूर : धुलीवंदनाच्या दिवशी (७ मार्च) सकाळी ७ वाजताच्या सुमारास घुग्घुस येथील वैकोली वणी कोळसा खाण परिसरातील न्यू कोल रेल्वे साईडिंग येथे चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातून रेल्वे मालगाडीचे इंजिन आले. या मालगाडीच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने वन खाते तथा घुग्घुस रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे.
धुळे – राज्यभरातील वेगवेगळ्या भागांत अवकाळी पाऊस झाला आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात दोन दिवसांत महसूल विभागातर्फे पंचनामे पूर्ण होतील. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातच शेतकऱ्यांसाठी भरीव अशी मदत जाहीर होईल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
येऊर हे राहण्याला मिळालेले वरदान आहे पण, मर्यादेच्याबाहेर गेल्यावर सर्वच गोष्टींचा ऱ्हास होतो. येउरमध्ये दीडशेहुन अधिक बेकायदा हॉटेल्स असून त्याठिकाणी पहाटेपर्यंत संगीत आणि मद्य पार्ट्या सुरू असतात. याचा आता कुठेतरी अंत व्हायला हवा, असे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. सविस्तर वाचा…
धुळे – जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील खोरी, टिटाणे आणि हट्टी भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या गारपीटीमुळे २५० ते ३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. केळी,पपई या फळपिकांसह कांदा, गहू आणि हरभरा ही पिके हातची गेली.
मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून अज्ञातांनी ३० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. सोबतच खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यात मध्यरात्री जोरदार सोसाट्याचा वारा अन मेघगर्जनेसह बरसणाऱ्या गारांचा अवकाळी थैमान बघावयास मिळाला रब्बी हंगामातील गहू, मूग हरभऱ्यासह उन्हाळी कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात काढणी करुन पोळ लावून ठेवलेला हरभरा, काढणीसाठी आलेला गहू, मूग,कांदा पीक गारांच्या मुसळधारेने अक्षरशः झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अजूनही शेतात पाणी साचले असून आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसल्याने हाता तोंडाशी आलेेला आलेेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून गेला आहे.यामुळं बळीराजा हवालदिल झाला आहे. सकाळ पासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. संध्याकाळी आठ वाजेदरम्यान आकाशात विजा चमकत होत्या मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जोरदार सोसाट्याचा वारा सुटला अन गारांच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री झालेल्या मुसळधारेने इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे,नांदुरवैद्य, कुऱ्हेगाव,गोंदे दुमाला, मुंढेगाव परिसर अक्षरशः झोडपून काढले.

खासदार संजय राऊत यांचं राजकारण डबल ढोलकी बडवल्याप्रमाणे झालं असल्याची टीका भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा यूपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावं असं राऊत म्हणत होते. मध्यंतरी राहुल गांधी यांनी करावं असे सुचवलं. मात्र आता राहुल गांधी बॅक फुटवर असून त्यांच्या जागी उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावं, असं सूचक वक्तव्य राऊतांनी केले आहे. एवढंच नाही तर ठाकरे दिल्लीला राहायला जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी राऊतांपासून सावध राहावं, अशी प्रतिक्रिया राम कुलकर्णी यांनी दिली आहे.
विदर्भातील प्रमुख फळपीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूड आणि मोर्शी तालुक्यातील संत्र्याची परिस्थिती गंभीर झाली असून रोगराई, अल्पभाव, प्रक्रिया उद्योगांचा अभाव यामुळे संत्री उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सविस्तर वाचा…
पीएमपीला गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांना थकीत देयकापोटीची ६६ कोटींची रक्कम पीएमपी प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा ठेकेदारांनी संप मागे घेतला. त्यामुळे मंगळवारपासून पीएमपीची पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सेवा पूर्ववत होण्यास सुरूवात झाली. सविस्तर वाचा…
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांना आपल्या संघटनेत प्रवेश देऊन कोकणात बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली आहे.

छत्रपती संभाजीनगर, गेल्या दोन - तीन दिवसापासून हवामानातील बदलाचे संकेत हवामान खात्याने दिले होते. त्या अनुषंगाने दोन दिवसापासून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तुरळक पाऊस सुरू होता. काल रात्री अचानक जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव , सिद्धनाथ वडगाव परिसरातील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील उभे पिके गहू, हरभरा, कांदा, फळबाग अवकाळी पावसाने व गारपिटीने नुकसान होऊन भुईसपाट झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात गारांचा पाऊस पडला आहे. ठाण्यात गारांचा पाऊस पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसंच राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उभी पिकं आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाने इच्छुकांना मुंबई महानगर प्रदेशात परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मंडळाने सोमवारी ४,६५४ घरांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून बुधवार, ८ मार्च रोजी दुपारी १२ वाजल्यापासून या सोडतीसाठीच्या अर्ज विक्री, स्वीकृतीस सुरुवात होत आहे.
मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन ते चार तासात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बीड, माजलगाव, गेवराई या तालुक्यात अवकाळी पाऊस झाला असून काही भागात गारपीट देखील झाली. तर या पावसाने काढणीला आलेल्या गव्हाचं नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला त्यामुळे गहू, हरभरा, फळबाग याला देखील याचा तडाका बसला आहे. माजलगाव तालुक्यातील हे चित्र आहे. यात वादळी वाऱ्याने गव्हाचे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.