लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग : पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी एनडीआरएफचे विशेष पथक रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये दाखल झाले आहे. पुढील अडीच महिने हे पथक महाड येथे मुक्कामास असणार आहे. मागील वर्षीच्‍या तुलनेत महिनाभर आधीच हे पथक महाडला पोहोचले आहे.

जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यामध्ये दरड कोसळण्याचा धोका निर्माण होत असतो तर महाडला मोठ्या पुराची समस्‍या निर्माण होते या बाबींचा विचार करून रायगड जिल्‍हा प्रशासनाने याबाबतची मागणी सरकारकडे केली होती. त्‍यानुसार एनडीआरएफचे पथक महाड येथे सज्ज ठेवण्यात आले आहे. एक इन्‍स्‍पेक्‍टर आणि ३० जवान अशा ३१ जणांचा यात समावेश आहे. महापूर तसेच दरड कोसळणे या सारख्या घटनांसह एखादा मोठा अपघात किंवा मोठी दुर्घटना घडली तरी सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठी सुसज्ज यंत्रणा उपलब्ध असल्‍याची माहिती एन डी आर एफ पथकाचे प्रमुख दिलीपकुमार यांनी दिली.

आणखी वाचा-कोकणात पावसाने दिली ओढ, सरासरीच्या तुलनेत ५४ टक्के पावासाची नोंद

मागील वर्षी जुलै महिन्‍यात हे पथक दाखल झाले होते. यंदा मात्र महिनाभर आधीच एनडीआरएफ महाडमध्‍ये सज्‍ज आहे. अगदी सुरूवातीच्‍या दिवसात हे पथक रायगड जिल्‍हयातील दरडप्रवण तसेच पूरप्रवण क्षेत्राची पाहणी करेल. आगामी काळात कुठे आपत्‍तीजनक परीस्थिती निर्माण होवू शकते याचा अभ्‍यास केला जाईल आणि तसा अहवाल जिल्‍हा प्रशासनाला दिला जाईल असे दिलीपकुमार यांनी सांगितले. या पथकाकडे स्‍वयंचलित बोट, कटर, लाईफ जॅकेटस यासह बचावासाठी आवश्‍यक सर्व साहित्‍य उपलब्‍ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रायगड जिल्‍हयात विशेषतः महाड पोलादपूर तालुक्‍यात पावसाळयात घडणाऱ्या दुर्घटना लक्षात घेवून तेथे कायमस्‍वरूपी एनडीआरएफचा तळ असावा अशी मागणी समोर आली. त्यानंतर तत्‍कालीन जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनाकडे प्रस्‍ताव पाठवला. तत्‍कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी त्‍याचा पाठपुरावा केला. या तळासाठी महाडमधील जागाही निश्चित झाली. परंतु अद्याप त्‍याची पूर्तता झालेली नाही. राज्‍य सरकारने एसडीआरएफचे पथक या ठिकाणी तैनात ठेवण्‍याचे मान्‍य केले होते परंतु त्‍याचेही घोडे अडलेले आहे.