सातारा : दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुक्यात अजिंक्य उद्योगसमूहातील अनेक सहकारी संस्थांसह तालुक्यातील गावागावांत विविध सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले व सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा आदर्शवत प्रयत्न केला. त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा अखंड चालवू, असा निर्धार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
शेंद्रे (ता. सातारा) येथे शुक्रवारी अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळा व स्मृतिस्तंभास अभिवादन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, संचालक मंडळातील सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘अभयसिंहराजे यांनी अंगीकारलेली विकासकामाची धुरा, त्यांचे आचार-विचार व जनसामान्यांच्या प्रेमळ पाठिंब्याच्या जोरावर जोमाने पुढे चालविण्यासाठी सर्वजण कटिबद्ध राहू. त्यांचे सहकारातील योगदान अनन्यसाधारण आहे. सातारा तालुका आणि जिल्ह्यासह राज्यभरात असंख्य सहकारी संस्थांच्या जडणघडणीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. सहकारमंत्री असताना राज्यभरातील सर्वच सहकारी संस्थांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच राज्यातील सहकार चळवळ आज जोमाने सुरू आहे. यापुढेही ही चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी स्व. भाऊसाहेब महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करण्याची शपथ उपस्थितांनी घेऊन दिवंगत भाऊसाहेब महाराजांना अभिवादन केले.
या वेळी प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, अजिंक्य उद्योगसमूहाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सतीश चव्हाण, किरण साबळे-पाटील, वनिता गोरे, सरिता इंदलकर, राहुल शिंदे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक सुरेश सावंत, कांचन साळुंखे, रवी कदम, बाजार समिती सभापती विक्रम पवार आदी उपस्थित होते.