Maharashtra – Raigad Rain Updates / अलिबाग – रायगड जिल्ह्यात सर्वदूर तुफान पाऊस सुरू आहे. अतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, कुंडलिका, सावित्री नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड, रोहा आणि नागोठणे परिसराला पूराचा धोका निर्माण झाला आहे. नदी किनाऱ्यावरील सखल भागात पूराचे पाणी शिरण्यास सुरवात झाल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहेत. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ९४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अलिबाग ८६ मिमी, पेण ८२ मिमी, म्हसळा २१५ मिमी, माणगाव ९१ मिमी, उरण ५१ मिमी, श्रीवर्धन १०२ मिमी, खालापूर ६० मिमी, रोहा १२० मिमी, पोलादपूर १०७ मिमी, मुरुड ८० मिमी, सुधागड ७८ मिमी, तळा ८८ मिमी, पनवेल ११६ मिमी, महाड ९२ मिमी, कर्जत ५५ मिमी तर माथेरान येथे ९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी सर्वदूर कोसळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका, अंबा आणि सावित्री नद्यांनी दुपारी २ ते अडीचच्या सुमारास धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रोहा, नागोठणे आणि महाड परिसराला पूरपरिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी किनाऱ्यांवरील रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश दिले आहेत.
महाबळेश्वर आणि पोलादूपर परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर येथील रानबाजीरे धरणातून प्रती सेकंद ७४९ घनमीटर वेगाने सावित्री नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भिरा जलविद्यूत तीन दरवाज्यामधून प्रकल्पातून ८३ घनमीटर प्रतिसेकंद वेगाने कुंडलिका नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पेण येथील हेटवणे मध्यम प्रकल्पातून भोगावती नदी पात्रात ११९ घनमीटर प्रती सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे उल्हास, पाताळगंगा, भोगावती, कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यात सखल भागात पाणी साचणे, वीज पुरवठा खंडीत होणे आणि वृक्ष उन्मळून पडणे यासारख्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असा दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरु असली, रेड अलर्ट जारी करण्यात आला असला तरी प्रशासानाकडून जिल्ह्यात आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली नव्हती, त्यामुळे सकाळच्या सत्रातील शाळा आणि महाविद्यालये नियमीतपणे सुरू होती.