रत्नागिरी : कोणत्या विभागात किती खर्च झाला? जर झाला नसेल तर त्याची कारणे काय? याबाबत जिल्हाधिऱ्यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घ्यावा. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी जनसुविधेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. यावेळी अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ साठी ८६०.२१ कोटीच्या मागणी आराखड्यास रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, मागील वर्षी जिल्ह्याच्या तरतूदीमध्ये भरीव वाढ झालेली आहे. यावर्षीही ती होईल. ८६० कोटींचा आराखडा बनविण्यात आला असून, राज्य नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्याबाबत निश्चितपणाने मागणी केली जाईल. जनसुविधेला प्राधान्य देताना १०० टक्के निधी खर्च झाला पाहिजे, त्याबाबत अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. नगरपंचायत, नगरपालिका यांचा विकासात्मक डिपीआर तयार करावा. प्रत्येक शहराचा विकासात्मक नियोजन करताना लागणाऱ्या निधीबाबत सविस्तर माहिती द्यावी. प्रत्येक तालुकानिहाय जेट्टींचा प्रस्ताव तयार करुन द्यावा असे सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्हा परिषदेने गोळप येथे केलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून निर्माण झालेल्या रत्नागिरी पॅर्टन राज्यात उदयास आला आहे. त्याचबरोबर टॅलेंट सर्च करुन इस्त्रो आणि नासासाठी जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना पाठविण्यात येत आहे. हा उपक्रम राज्यातील ७ जिल्ह्यांनी स्वीकारला आहे. गुहागरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीबाबत चांगले नियोजन करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीबाबतचा आढावा दर १५ दिवसांनी घ्यावा. ऑक्टोबरपर्यंत कार्यांरभ आदेश व्हायला हवेत, यापध्दतीने अधिकाऱ्यांनी नियोजन करावे असे ही सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाधिकारी सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करुन ३१ मार्च पर्यंत १०० टक्के निधी खर्च केला जाईल, असे सांगितले. सभेच्या सुरुवातीला दिवंगत माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली. खासदार राणे, खासदार तटकरे, आमदार निकम, आमदार जाधव, आमदार लाड, आमदार सामंत यांनी विविध विषयांवर सहभाग घेतला. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे यांनी आभार मानले.