राज्यातील सत्ता बदलानंतर आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड झाल्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. ऐतिहासिक शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा यंदा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. तसेच मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचंही महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं. दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही याचिका देखील फेटाळली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर शिवसेना खासदार विनाय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

खासदार विनायक राऊत म्हणाले, “न्यायदेवतेचे आम्ही मनापासून आभारी आहोतच, सत्याचा विजय न्यायालयात झालेला आहे. पहिल्यापासूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठामपणे सागंत होते, की आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच साजरा करण्यास आम्हाला परवानगी मिळेल, अशी खात्री होती, आत्मविश्वास होता. आज हा आमचा आत्मविश्वास खरा ठरलेला आहे. पुन्हा एकदा मी न्यायदेवतेचे आभार मानतो.”

शिंदे गटाला धक्का! शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हायकोर्टाकडून परवानगी

याचबरोबर “शिवतीर्थावर मागील अनेक वर्षापासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे मेळावे झाले. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवतीर्थावर आम्ही सीमोल्लंघन केलं आणि यावेळी मात्र या शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपाच्या माध्यमातून या दसरा मेळाव्यात कुठेतरी खोडा घालायचा, अडथळा निर्माण करायचा यासाठी शिंदे गटाच्या एका आमदाराने याचिका दाखल केली होती. सुदैवाने न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. परंपरागत दसऱ्याचा मुहूर्तावर विचारांचं सीमोल्लंघन करायचं, विचारांचं सोनं लुटायचं ही परंपरा बाळासाहेब ठाकरे यांनी जी सुरू केली होती. तीच परंपरा उद्धव ठाकरे यांनी सुरू ठेवलेली आहे. यावर्षी देखील त्याच परंपरेला अनुसरून शिवतीर्थावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचाराचं सोनं लुटलं जाईल आणि ही आमच्या दृष्टीकोनातून अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे.” असंही राऊत यांनी सांगितलं.

तर, “न्यायदेवता जरी आंधळी असली तरी ती सत्याला न्याय देणारी देवता आहे. त्यामळे न्यादेवतेने जे ताशेरे ओढले आहेत. जो निर्णय दिलेला आहे. तो त्यांना शहापणा यावा, अशा दृष्टीकोनातून आहे. आतातरी शिंदे गटाने अशा पद्धतीची शिवसेनेच्या मार्गात काळी मांजरं सोडण्याचा प्रयत्न बंद करावा. लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, तो अधिकार बजावत असताना असे अडथळे आणण्याचं जर त्यांनी काम केलं. तर नक्कीच न्यायालय त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.” अशा शब्दांत राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं माध्यमंप्रतिनिधींनी सांगताच, “आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय़ दिला त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालय देखील सत्याच्या बाजूने न्याय देऊन शिवसेनेचे, उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील विचार आम्हाला ऐकायला मिळतील अशी आम्हाला खात्री आहे.” अशी शब्दात राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.