मुंब्रा येथील शाखेची शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. उद्धव ठाकरेंना शाखेजवळ जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे गट आणि पोलिसांचा समाचार घेतला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “पोलिसांचं धन्यवाद मानतो. कारण, त्यांनी शाखाचोरांचं रक्षण केलं. प्रशासन हतबल झाल्याचं संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आज येथे काही घडलं असतं, तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. सत्तेची गादी भोगणाऱ्यांनी आधीच महाराष्ट्राची अब्रू घालवली आहे.”
हेही वाचा : शिंदे गटात वादाची ठिणगी! गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांचा ‘गद्दार’ म्हणून केला उल्लेख; म्हणाले…
“निवडणुकीत तुमची मस्ती फाडतो”
“सत्तेचा माज आलेल्यांनी बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली. पण, खरा बुलडोझर घेऊन मी मुंब्र्यातील रस्त्यावर आलो आहे. आपली बॅनर फाडल्याचं मला कळलं. मात्र, निवडणुका येऊद्या तुमची मस्ती फाडतो,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला आहे.
“…अन्यथा आम्ही येऊन तो खोका उचलून फेकून देईल”
“खोके सरकारनं आमची शाखा पाडून एक खोका अडकवून ठेवला आहे. आमच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे. तो खोका लवकरात लवकर उचलावा. अन्यथा आम्ही येऊन तो खोका उचलून फेकून देईल. तुमच्यात हिंमत असेल, तर पोलिसांना बाजूला सारून समोर या,” असं आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं आहे.
“लोकसभा निवडणुकीत गद्दाराची अनामत रक्कम जप्त करून घरी पाठवा,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना लक्ष्य केलं.
हेही वाचा : “शाखा पाडली, बॅनर्स फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडतो”, मुंब्र्यात उद्धव ठाकरे कडाडले
“…आता मधमाशा कुठे-कुठे डसतील पाहा”
“या नेभळटांना कुणीही थारा द्यायचा नाही. प्रशासन चोरांचे गुलाम नाही. पोलिसांनी चोरांचं रक्षण केलं आहे. पण, चोरांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. आता मधमाशा कुठे-कुठे डसतील पाहा,” असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला आहे.