सांगली : महापालिका निवडणुका काँग्रेस ताकदीने लढविणार असून, यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीत राहावे, स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविल्या जातील, याबाबत लवकरच माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा करू, असे प्रतिपादन आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले.

सांगलीतील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसच्या माजी नगसेवक, पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीस खासदार विशाल पाटील, प्रा. सिकंदर जमादार उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले, काँग्रेस एकेकाळी जिल्ह्यात भक्कम होती. पण आज भाजप जरी सत्तेवर असले तरी आज ना उद्या सत्ता पलटेल आणि काँग्रेस सत्तेवर येईल, त्या दिवसाची आम्ही वाट पाहतोय.

काँग्रेस पक्ष काहीजण सोडून गेले असले तरी लोक आणि पक्षाचे कार्यकर्ते अजून काँग्रेस सोबतच आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी सांगली, मिरज विधानसभा मतदार संघात काँग्रेसला लोकांनी भरपूर मदत केली. यामुळे आजही तळातील सामान्य माणूस काँग्रेस विचाराला आपले मानणारा आहे, हे स्पष्ट होते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसचाच आधार वाटत आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस सामान्यांच्या ताकदीवर लढणार आहे. यासाठी लागेल ती मदत मी व खासदार पाटील करू, यात शंका बाळगण्याचे कारण नाही. तसेच राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आमदार जयंत पाटील व रोहित पाटील यांच्याशी निश्चितपणे आघाडीबाबत चर्चा करू. शिवसेनेसोबत चर्चा करू. त्यातून आगामी निवडणुका एकजुटीने लढण्याचाच प्रयत्न आमचा असणार आहे. त्यातून जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगले यश मिळेल, असा विश्वास डॉ. कदम यांनी व्यक्त केला.

काँग्रेस पक्ष काहीजण सोडून गेले असले तरी लोक आणि पक्षाचे कार्यकर्ते अजून काँग्रेस सोबतच आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी सांगली, मिरज विधानसभा मतदार संघात काँग्रेसला लोकांनी भरपूर मदत केली. यामुळे आजही तळातील सामान्य माणूस काँग्रेस विचाराला आपले मानणारा आहे, हे स्पष्ट होते असेही ते म्हणाले.

दरम्यान, पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहर जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे. या पदासाठी पक्षासाठी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्याचा विचार प्राधान्याने केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होऊ नये, असे आमदार डॉ. कदम माध्यमांशी बोलताना म्हणाले. हैद्राबाद गॅझेटचा प्रश्न सुटल्याने मराठवाड्याील मराठा बांधवांचा प्रश्न सुटेल. सातारा आणि औंध गॅझेटचा एक महिन्यात तोडगा निघेल, असेही त्यांनी सांगितले.