गेल्या काही दिवसात देशातील करोनाची परिस्थिती पाहता लोकांमध्ये चिंता वाढू लागली आहे. अशात अनेक सेलिब्रिटी गरजुंच्या मदीतीला धावून जात आहेत. अनेक कलाकार सोशल मीडियावरून मदतीचं आवाहन करत आहेत. तर काही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नागरिकांचं मनोबल वाढवण्याचा प्रतत्न करत आहेत. यातच बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने चाहत्यांना धीर देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली. मात्र यामुळे अभिषेकला ट्रोल करण्यात आलं. तर अभिषेकने ट्रोल करणाऱ्याला जबरदस्त उत्तर दिलं आहे.

अभिषेक बच्चनने एक पोस्ट शेअर केली होती. यात तो म्हणाला, “मी तुम्हा सर्वांना एक मोठी मिठी पाठवत आहे. याला रीट्विट करा आणि प्रेम पसरवा. सध्याच्या काळात आपल्याला याची गरज आहे. यावर एका युजरने म्हंटलं, “आलिंगन पाठवण्याऐवजी तुम्ही आणखी काही केलं असतं तर बरं झालं असतं. सध्या लोकांचा ऑक्सिजन आणि बेड उपलब्ध नसल्याने मृत्यू होतोय. फक्त आलिंगन पुरेसं नाही” अशी कमेंट करत युजरने अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

युजरच्या या कमेंटवर अभिषेकने देखील उत्तर दिलं आहे, ” मी करतोय मॅम. मी सोशल मीडियावर काही सांगत नाही याचा अर्थ मी काही करत नाही असा नव्हे. आपण सगळेच सर्व ते प्रयत्न करत आहोत. परिस्थिती खूप चिंताजनक असल्याने मी थोडं प्रेम आणि सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला.” असं संयमी उत्तर अभिषेकने दिलं आहे.

या आधी देखील अभिषेकला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. अभिषेक नुकत्याच आलेल्या त्याच्या ‘बिग बुल’ सिनेमामुळे तो ट्रोल झाला होता. लवकरच अभिषेक ‘दसवी’ या सिनेमातून झळकरणार आहे.