नीलेश अडसूळ

अभिनयाचे दाखले देऊन कोणत्याही नटाची ओळख सांगता येते, पण असे फार कमी नट आहेत ज्यांची ओळख केवळ त्यांच्या आवाजावरूनही स्पष्ट होते. त्यापैकी एक म्हणजे डॉ. गिरीश ओक. त्यांची नव्याने ओळख सांगण्याची आवश्यकता नाही परंतु ‘झी मराठी’वरील ‘अग्गं बाई सासूबाई’ मालिकेतून ते पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. चित्रपटांमधील त्यांचा वावर फारसा अधोरेखित झाला नाही, पण नाटक आणि मालिकेतून त्यांनी साकारलेल्या भूमिका स्मरणीय ठरल्या आहेत. मग ते ‘दीपस्तंभ’, ‘कुसुम मनोहर लेले’, ‘यू टर्न’सारखी नाटकं असो किंवा ‘साहेब बीबी आणि मी’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ किंवा आताची ‘अग्गं बाई सासूबाई’ यासारख्या मालिका..

पस्तीस वर्षांहून अधिक काळ तिहेरी माध्यमांमधून अविरत काम करणारे गिरीश ओक अनुभवातून येणाऱ्या परिपक्वतेवर कायमच विश्वास ठेवत आले आहेत. याच अनुभवांची मांडणी करताना ते सांगतात, नागपूर ते मुंबई हा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता. महाविद्यालयातून जडलेली कलेची आवड आणि दुसरीकडे वैद्यकीय शिक्षणाचा घाट  यामध्ये नेमके काय निवडावे इथूनच सुरुवात होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असताना अनेक एकांकिका आणि प्रायोगिक नाटकांमधून काम केले. परंतु या कलाप्रवासाचा अभ्यासावर होणारा परिणाम घरच्यांना काहीसा रुचला नसल्याने पुढे वैद्यकीय शिक्षणाला प्राधान्य दिले. ‘डॉक्टर’ म्हणून काही काळ वैद्यकीय सेवाही केली, परंतु कलेच्या ओढीने मला स्वस्थ बसू दिले नाही..

याच कलेच्या प्रेमामुळे घरच्यांचेही मन वळवण्यात ते अखेर यशस्वी झाले. १९८४ मध्ये मोहन कोठीवान यांच्या ‘साहेब विरुद्ध मी’ या नाटकातून गिरीश यांचे व्यावसायिक नाटकात पदार्पण झाले आणि पुढे प्र. ल. मयेकर लिखित ‘दीपस्तंभ’ ही  अजरामर कलाकृती त्यांच्या वाटय़ाला आली. या विषयी ते सांगतात, एखाद्या क्षेत्रात हात धरून पुढे नेणारं कुणीतरी हवं असतं  ते काम मोहन कोठीवान यांनी केलं. त्यांच्या नाटकातून खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात झाली. ‘दीपस्तंभ’ या कलाकृतीनंतर अनेक चांगल्या नाटकांमधून भूमिका मिळत मिळत गेल्या. त्यामुळे ‘दीपस्तंभ’ने आयुष्याला खरे वळण दिले, असं ते म्हणतात.

माझ्या वाटय़ाला फारसे सिनेमे आले नाहीत. काही आले पण मी केले नाहीत आणि जे केले त्यांची संख्या फारच कमी आहे, असे सांगतानाच त्या चित्रपटांपैकी पठ्ठे बापूराव यांच्या जीवनावर आधारलेला ‘लावण्यवती’ हा चित्रपट विशेष उल्लेखनीय होता असं त्यांनी सांगितलं. एखाद्या कलाकाराचा प्रवास एकांकिका, प्रायोगिक, व्यावसायिक नाटक नंतर मग मालिका आणि चित्रपट असा काहीसा होतो. त्यातही बरेच कलाकार चित्रपटाकडे वळल्यानंतर मालिका आणि नाटकाकडे पाठ फिरवतात, परंतु माझ्यासाठी मालिका आणि नाटक हा कायमच जिव्हाळ्याचा विषय आहे, असं गिरीश ओक यांनी सांगितलं. मालिकेविषयीचा अनुभव सांगतानाही आजसारख्या पाचशे-हजार भागांच्या मालिका तेव्हा नव्हत्या. दूरदर्शनवर मालिका लागणे हीच मोठी गोष्ट होती, याची आठवण त्यांनी करून दिली. शन्ना नवरेंच्या कादंबरीवर आधारलेल्या ‘नो प्रॉब्लेम’ या दूरदर्शनवरील मालिकेने माझे मालिका विश्वात पदार्पण झाले. त्यानंतर ‘अवंतिका’ या लोकप्रिय मालिकेतून मी घराघरांत पोहोचलो. ‘गोजिरवाण्या घरात’ ही मालिका तब्बल साडेनऊ  वर्षे चालली. त्यानंतर एकामागोमाग एक मालिका येत राहिल्या आणि मी प्रत्येक भूमिकेला न्याय देत गेलो. तोच मालिकेचा प्रवास आज ‘अग्गं बाई सासूबाई’पर्यंत पोहोचला आणि लोक त्या पात्राच्या प्रेमात आहेत यासारखी मोठी पावती नाही, असं ते म्हणतात.

तर मालिकेतील अभिनय आणि नाटकातील अभिनय यांच्यात तफावत आहे, नाटकातच खरा अभिनय कळतो, नव्या पिढीचा अभ्यास कमी पडतो अशा टीकाटिपण्या अनेकांकडून केल्या जातात. परंतु गिरीश ओक मात्र असा भेद करत नाहीत. त्यांच्या मते नाटक असो, चित्रपट वा मालिका.. अभिनय हा अभिनय असतो. माध्यम वेगळे आहे. तंत्रज्ञान वेगळे आहे त्यामुळे अभिनय कसा करावा याची पद्धत नक्कीच बदलते पण कोणताही अभिनय चांगला किंवा वाईट हे ठरवणे चुकीचे आहे, असं ओक सांगतात. त्यांच्या मते, नवी पिढी अधिक सजग आणि तत्पर आहे. तंत्रज्ञानाने पुढारलेली ही पिढी नवनवीन प्रयोग करू पाहात आहे. कोणतंही शिक्षण हे अनुभवाशिवाय मिळत नाही त्यामुळे आता ते शिकत आहेत, अनुभव घेत आहेत आणि या अनुभवाची परिपक्वता आली की नव्या पिढीची कामेही समृद्ध वाटू लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नव्या पिढीबाबत आश्वासक भूमिका मांडताना, इथे येणाऱ्या प्रत्येकालाच उत्क्रांतीतून जावे लागते. ती उत्क्रांती प्रत्येकातच घडते आहे म्हणून मराठी रंगभूमी इतकी विकसित होऊ  शकली, असं मत त्यांनी मांडलं. वानगीदाखल ते स्वत:चंच उदाहरण देतात. यासंदर्भात माझी  ‘यू टर्न’ नाटकाची एक आठवण आहे. २००५ मध्ये  ‘यू टर्न’ नाटक सुरू असताना एका प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर आले होते. प्रयोग पाहिल्यानंतर त्यांना थक्क व्हायला झालं, ते म्हणाले ‘गिरीश अरे किती सहज करता तुम्ही हे सगळं. आमच्या वेळी असं थिएटर नव्हतं. आणि असे प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न केला तरी ते यशस्वी होण्याची शक्यता फार कमी होती. मला असंच थिएटर आवडतं जे आज घडू लागलं आहे’. अमरापूरकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतच ती प्रक्रिया समजून घेता येते, याक डे त्यांनी लक्ष वेधलं.

नाटक-मालिकेतील कामं लोकप्रिय होत असली तरी गिरीश ओक यांना असलेली आवाजाची बैठक काहीशी वेगळी आहे. म्हणजे अभिनयासोबतच त्यांचा आवाज हीदेखील त्यांची ओळख आहे. आवाजाच्या जोपासनेविषयी ये सांगतात, प्रत्येकाला मिळालेला आवाज ही एक दैवी देणगी आहे. पण तो कसा वापरावा, कुठे वापरावा आणि किती वापरावा याचे परिमाण मात्र नटाला कळायला हवे.  विशेष म्हणजे तो आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असायला हवं. आपण जे बोलतोय, जे सांगतोय त्यातला शब्दच नव्हे तर अक्षरही लोकांना स्पष्ट ऐकू जायला हवं. याचा दाखला देताना त्यांनी ‘देहभान’ नाटकाचा किस्सा सांगितला. या नाटकाच्या प्रयोगानंतर झालेल्या परिसंवादात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे म्हणाले होते, ‘गिरीश, या नाटकातील तुझी वाक्यं अशी आहेत की अचूक उच्चारली, अचूक पोहोचवली तर टाळी अन्यथा चप्पल’. शिवाय नासिरुद्दीन शहा, शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, राज कुमार अशा दिग्गजांची उदाहरणं देत ते सांगतात, या कलाकारांच्या आवाजावरून त्यांची ओळख असली तरी संवाद कसे फेकावेत, चढ-उतार कसा असावा याची उत्तम शैली त्यांना अवगत होती. ती अवगत असेल तर वाक्य नुसतं पोहोचत नाही ते लागतं, असा अनुभवही ते सांगतात.

* काकाजी साकारणार

काही वर्षांपूर्वी ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाची निर्मिती करण्याची संधी मला मिळाली. या नाटकातील ‘काकाजी’ ही भूमिका मला सर्वाधिक प्रिय असल्याने आपण ती करावी अशी इच्छा गेली कित्येक वर्ष मनात होती. परंतु त्या पात्राचे वय आणि एकंदर स्वभाव पाहता आता मी ती भूमिका करण्यासाठी सक्षम झालो आहे असे वाटते. म्हणून पुन्हा एकदा तेच नाटक नव्याने रंगभूमीवर आणणार आहे. ज्या संचात काकाजीची भूमिका मी स्वत: करणार आहे.

* नव्या पिढीला शाब्बासकी

नव्या पिढीकडे पाहतो तेव्हा कौतुक वाटतं. एकांकिकांच्या माध्यमातून नाना विषय, नाना तंत्रज्ञान ही मुलं रंगभूमीवर घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवर व्यावसायिक सारखे चित्र उभे राहिले आहे. आज जेव्हा तरुण मुलं लॅपटॉप आणि हेडफोन लावून नाटकाचं संगीत करण्यासाठी बसतात, एखाद्या आविष्काराला लाजवतील अशी प्रकाशयोजना अगदी सहज रंगमंचावर उभी करतात तेव्हा त्यांच्या कामाचा हेवा वाटतो.

* कवितेशी नाते

सुरुवातीला मी कविता करू लागलो तेव्हा मलाच धक्का बसला होता. आपण नक्की बरे आहोत का असेही अनेकदा माझ्या मनात आले. पण कवी किशोर कदम माझा मित्र असल्याने त्याच्याशी चर्चा केल्या आणि कविता सुचणं हे सामान्य माणसाचं लक्षण आहे याची जाणीव त्याने करून दिली. पुढे लिहीत राहा असा सल्लाही त्याने दिला. पुढे त्यातूनच ‘चिवित्रा’ नावाची लेखमाला मी लिहिली. परंतु ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांच्यामुळे कविता अधिक कळू लागली. ‘गंध प्रीतीचा’ या कार्यक्रमात त्यांनी काव्यवाचनाची संधी मला दिली.