25 September 2020

News Flash

जगण्यातल्या गुंत्यांचा चकवा

‘आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल’

‘आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल’

प्रसंग १ : चित्रकार इमरोज यांनी एकदा अमृता प्रीतम यांच्याकडे आपल्या स्खलनाची प्रांजळपणे कबुली देताना सांगितलं की, ‘शरीराची भूक अनावर झाल्यानं मी एकदा वेश्येकडे जायचं ठरवलं होतं.’ त्यावर अमृता प्रीतमनं उत्तर दिलं होतं.. ‘ती स्त्री मी असायला हवी होते.’

प्रसंग २ : कवी साहिर लुधियानवी यांच्या ‘आओ.. कोई ख्वाब बुने’ या काव्यसंग्रहाचं मुखपृष्ठ बनवून देताना इमरोजनी अमृता प्रीतमना म्हटलं होतं.. ‘साहिर स्वप्नं विणण्याची गोष्ट करतोय.. स्वप्न होण्याची नाही.’ अमृताचं अवघं भावविश्व व्यापून राहिलेल्या साहिरबद्दलचं इमरोजचं हे निरीक्षण!

..हे दोन प्रसंग अचानक आठवायचं कारण : गजेंद्र अहिरे लिखित-दिग्दर्शित ‘आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल’ हे नाटक! आपल्या व्यावसायिक मराठी रंगभूमीची प्रचलित चौकट मोडून नाटक सादर करण्याची परंपरा तशी अपवादात्मकच. नव्वदीच्या दशकात काही प्रमाणात हे घडलं. पण त्याची पायातळीची वाट मात्र होऊ शकली नाही. अलीकडच्या काळात ‘बॉम्बे- १७’, ‘समुद्र’, ‘कोडमंत्र’, ‘संगीत देवबाभळी’ यांसारख्या नाटकांनी मुख्य धारेतील रंगभूमी पुन्हा या अनवट वाटेकडे वळताना दिसते आहे. या परंपरेतलं हे आणखी एक नाटक. व्यावसायिक रंगभूमीच्या प्रेक्षकांना काहीसा धक्का देणारं!

नाटकाच्या नावापासूनच हे धक्कातंत्र योजलेलं. ‘आबालाल अडकित्ते’ आणि ‘मुमताज महल’ यांचा परस्परसंबंध काय? नाटक विनोदी आहे की गंभीर? काहीच पत्ता लागत नाही नावातून. या चकव्यानंच नाटकाची सुरुवात होते. राघव हा एक मस्त कलंदर, मनस्वी चित्रकार. मनमौजी. मुंबईत ‘धंदेवाईक’ कामासाठी आपल्यातल्या कलाकाराला जुंपावं लागल्यानं अस्वस्थ, बेचैन झालेला. सई त्याची मैत्रीण तथा लिव्ह-इन पार्टनर. ती एका कन्स्ट्रक्शन कंपनीत मॅनेजर आहे. राघवमधील मनस्वी कलावंतावर ती भाळलेली. त्याचं विक्षिप्त, तऱ्हेवाईक वागणं, बोलणं, जगणं ती समजून घेते. धंदेवाईक गोष्टीसाठी आपल्या कलेला जुंपावं लागल्याने आलेल्या मेन्टल ब्लॉकमधून ती राघवला बाहेर काढू पाहते. पण राघव त्यातून बाहेर येतच नाही. त्या तगमगीनं तो अधिकाधिक खोल रुतत चाललेला. सईला वाटतं, काही काळानं का होईना, तो यातून बाहेर पडेल. नॉर्मल होईल. पण नाही.

राघवची चाळमालकीण पांचाळबाई ही तिचा नवरा तुरुंगात असल्यानं एकटी, एकाकी झालेली स्त्री. आपलं एकाकीपण दूर करण्याकरता ती राघवला आपल्या पाशात ओढू बघते. शरीराची भूकही असतेच सोबत! सईला हे चांगलंच माहीत आहे. म्हणूनच ती पांचाळबाईच्या या करणीकडे काहीशा तटस्थ अलिप्ततेनं बघू शकते. तिला तिचा राग येत नाही. किंवा तिच्यापासून राघवला दूर करावं असंही तिला वाटत नाही. उलट, पांचाळबाईच्याच मनात सईला पाहिलं की अपराधी भाव येतो.

पण राघव मात्र या सगळ्यापल्याड गेलाय. त्याला खाण्यापिण्याची, वास्तवाची.. कशाचीच शुद्ध उरलेली नसते. असे अधांतरी, बेचैन दिवस कटत असताना एके दिवशी राघवला कुणा अज्ञात स्त्रीचा फोन येतो. तिच्या मऊ मुलायम आपुलकीच्या स्वरानं त्याच्या तगमगीवर फुंकर घातली जाते. पण ती स्त्री आपलं नाव, अतापता काहीच सांगत नाही. तिचे फोन अधूनमधून येत राहतात. त्यातून राघवची तिच्याबद्दलची उत्कंठा दिवसेंदिवस वाढीस लागते. त्याच्या मनाची आणखीनच तगमग सुरू होते. तिच्या भेटीची असोशी शिगेला पोहोचते. पण ती त्याला भेटायला चक्क नकार देते. आपला फोन नंबरही त्याला देत नाही. प्रत्यक्ष भेटीनं कदाचित त्याचा विरसच होईल असं ती त्याला परोपरीनं समजावू पाहते.

सईच्या ऑफिसमधील तिचा असिस्टंट असलेला वाघ हा राघवच्या चाळीतच राहत असतो. वाघ : गावातून आलेला एक रासवट, उथळ माणूस. तोंडात सदा शिव्या. त्याची बायको जया ही चित्रकार राघवला नेहमी दुरून न्याहाळत असते. एके दिवशी ती सगळा धीर एकवटून नवरा घरी नसताना राघवला भेटायला जाते. त्याच्यासाठी कॉफी बनवून नेते. एकेकाळी तीही कलेचीच विद्यार्थिनी होती. पण तिच्या आयुष्याचे फासे असे काही विचित्र पडलेले, की वाघसारख्या माणसाशी तिला नाइलाजानं लग्न करावं लागलेलं. राघव चित्रकार आहे हे कळल्यावर त्याच्या रंगांच्या गंधानं ती खुळावलेली. राघव त्या भेटीत तिच्यातल्या चित्रकाराला जागं करू पाहतो. पण आयुष्यातल्या वंचनेनं पूर्णत: आक्रसून गेलेली, आत्मविश्वास हरवून बसलेली जया पुन्हा ब्रश हाती धरायला साफ नकार देते. तेव्हा राघव तिला न्यूड चित्राकरता मॉडेल होशील का, म्हणून विचारतो. कशी कुणास ठाऊक, ती किंचितही आढेवेढे न घेता त्यास राजी होते.

अर्थात पुढे या सगळ्यातून काय ‘महाभारत’ घडतं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. राघव, सई, पांचाळबाई, जया, वाघ, ती फोनवाली अनाम स्त्री अशा सर्वांच्याच आयुष्याचा एकत्रित काला होऊन मानवी जीवनाचं एक धूसर, कॅलिडोस्कोपिक चित्र ‘आबालाल अडकित्ते..’च्या रूपानं आपल्यासमोर उभं राहतं.

लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी एका मनस्वी, कलंदर कलावंताचं आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या स्त्रियांचं उत्कट, अलवार, तितकंच समंजस चित्र ‘आबालाल अडकित्ते..’मध्ये आकारलं आहे. यातली माणसं आपल्या आदिम, उत्कट प्रेरणेतून आयुष्याच्या सुसाट प्रवाहात ओढली जातात. आणि मग त्यांचं प्राक्तन जिथं घेऊन जाईल तिथं ती प्रवाहपतितागत वाहवत जातात. मानवी जीवनाचं हे (अतिपरिचयाचं नसलं, तरीही) कोलाज निश्चितच अंतर्मुख करणारं आहे. गजेंद्र अहिरे यांनी यातल्या पात्रांना नियतीच्या हाती सोपवलं आहे. कुणाचीही त्याबद्दल तक्रार नाहीए. अगदी पांचाळबाईंचीसुद्धा.

नाटकात एक गोष्ट खटकते : जया व सई या पात्रांच्या तोंडी लेखकानं दिलेली काव्यात्म भाषा. राघवसारख्या कलाकाराच्या तोंडी ती शोभत असली तरी या दोघींच्या बाबतीत तसं म्हणता येत नाही. लेखकानं जबरदस्तीनं त्यांच्या मुखी ती लादली आहे. दुसरी बाब : राघव अचानक काहीही न सांगतासवरता घर सोडून गेल्यानं (नाही म्हटलं तरी) पांचाळबाईही थोडीशी हलली असणारच. पण नाटकात तसं काही दिसत नाही. ते दिसतं शेवटच्या तिच्या-राघवच्या भेटीत. शमी ही राघवच्या आयुष्यातली आणखी एक स्त्री. प्रत्यक्षात जरी ती कधीच अवतरत नसली तरी त्याचं अवघं आयुष्य ती व्यापून आहे. कादंबरीसारखं बहुकेन्द्री आशयसूत्रं असलेलं हे नाटक सिनेमॅटिक तंत्रात पेश केलेलं आहे. पात्रांचं निवेदन आणि घटना-प्रसंगांची प्रत्यक्ष गुंफण अशा मिश्र फॉर्ममध्ये ते सादर होतं. राघव सगळ्यात असूनही कशातच नसतो. त्याचं मनस्वीपण रेखाटलं जात असतानाच अकस्मात तो ‘नॉर्मल’ होत्सासा चित्रप्रदर्शने, प्रसिद्धी वगैरेंचा सहज स्वीकार करू लागतो तेव्हा नाटक भरकटल्याची जाणीव होते. सूक्ष्मात गेलेलं नाटक अचानक ‘ढोबळ’ होतं. एक मात्र खरंय.. गजेंद्र अहिरेंना एक धूसर, गूढ, काहीसं स्वप्नील घटित चितारायचं आहे. त्याच्या विलक्षण खुणा जागोजाग आढळतात. परंतु त्यांतली तरलता, चित्रमयता, नाद, ठाय लय मधेच त्यांच्या चिमटीतून निसटल्यासारखी वाटते. काही प्रसंगांत त्यांना हे साधलेलं आहे. विशेषत: पहिल्या अंकाच्या शेवटीच्या न्यूडचित्राच्या प्रसंगात, तसंच राघवच्या पांचाळबाईशी झालेल्या अखेरच्या भेटीत! संपूर्ण नाटकाला एक गहन, गहिरी काव्यात्म लय दिग्दर्शकानं दिली आहे. कलाकारांनी ती कसोशीनं आत्मसात केली आहे.

प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्यातून चित्रकाराचं गूढ, फुलपाखरी मन आणि त्याच्या भवतालाचा चित्रदर्शी विचार केलेला नाटकात जाणवतो. राघवच्या घराची, त्यातल्या वस्तूंची विशिष्ट रचना आणि कोन वातावरणनिर्मितीत महत्त्वाची भूमिका निभावतात. नाटकात बरीच स्थळं आहेत. ती कधी सूचक, तर कधी सांकेतिक, तर अनेकदा वास्तवदर्शी रीतीनं त्यांनी साकारली आहेत. बहुस्थळी तसंच दिवसातल्या वेगवेगळ्या प्रहरी घडणारं हे नाटक अर्थवाही प्रकाशयोजनेतून मुळ्ये यांनी देखणं, दृश्यात्म केलं आहे. मराठी नाटकांत अभावानंच आढळणाऱ्या दृश्यात्मक रंगभाषेचा वापर त्यांनी यात अप्रतिमरीत्या केलेला आहे. शैलेंद्र बर्वे या गुणी संगीतकारानं नाटकातले क्षणोक्षणी बदलणारे मूड्स गहिरे केले आहेत. सोनल खराडे यांनी पात्रांची केलेली वेशभूषा ही त्यांच्या तशा असण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

राघवच्या मनस्वी आणि देहस्वी भूमिकेला शशांक केतकर यांनी न्याय दिला आहे. राघवची मनस्वी वृत्ती, त्याचं नितळ साधेपण त्यांनी कुठल्याही गिमिक्सचा आधार न घेता प्रकट केलं आहे. त्याची काव्यमय भाषाही त्यांनी सहजगत्या पेलली आहे. राघवच्या अस्वस्थ आत्म्याची तडफड अन् तगमग त्यांनी उत्कटतेनं व्यक्त केली आहे. राघवला आरपार जाणणाऱ्या, त्याच्यावरील डोळस प्रेमानं आंधळ्या झालेल्या सईचा नि:शंक समजूतदारपणा नेहा जोशी यांनी ताकदीनं दर्शवला आहे. पांचाळबाईंचं उच्छुंखल व्यक्तिमत्त्व आणि शेवटी सारं हातून निसटून गेल्यावरची दुखरी, हळवी नस आणि आयुष्यानं शिकवलेलं शहाणपण नम्रता आवटे यांनी सर्वागानं पुरेपूर पोचवलं. जयाचं काकूबाई छापाचं व्यक्तित्व, परंतु त्यात खोलवर दडलेलं बंडखोर मन, राघवच्या सहवासातलं जयाचं फुलणं व त्याची झालेली भयंकर परिणती.. इतका विस्तृत परीघ किरण राजपूत यांनी सहज पार केला आहे. प्रणव जोशींनी श्रीयुत वाघ नामे रांगडा गडी फर्मास रंगवला आहे. त्याच्या प्रच्छन्न वर्तनामागील भावकल्लोळही त्यांनी तितक्याच सूक्ष्मतेनं व्यक्त केला आहे. श्रद्धा मोहितेंची आढय़ताखोर कलासमीक्षक यथार्थवादी आहे.

‘चाकोरी तोडणारा प्रयोग’ असं या नाटकाचं वर्णन करावं लागेल. असे ‘प्रयोग’ रंगभूमीवर झाले तरच ती प्रवाही राहील. आणि आधुनिकही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 3:20 am

Web Title: articles in marathi on marathi natak 2
Next Stories
1 निखळपणा जपणारा दीर्घांक
2 आणखी एका गर्लफ्रेंडला जॉन सीनाचा रामराम
3 जडणघडण विनोद
Just Now!
X