बायोपिकचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये चांगलाच स्थिरावला आहे. खेळाडूंपासून ते राजयकीय नेत्यांपर्यँत किंवा एखाद्या कलाकाराच्या आयुष्यावर आधारित प्रवासापर्यंत काही रंजक गोष्टी या बायोपिकच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. या साऱ्यामध्ये खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित बायोपिकला प्रेक्षकांनी विशेष प्रतिसाद दिल्याचंही पाहायला मिळत आहे. हीच बाब लक्षात घेत आता आणखी एका खेळाडूचा थक्क करणारा प्रवास रुपेरी प़द्यावरून पाहता येणार आहे. त्या खेळाडूचं नाव आहे डिंको सिंग.

बॉक्सिंग या खेळामध्ये भारताला आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या या खेळाडूचा रंजक आणि प्रेरणादायी प्रवास सिनेरसिकांना पाहता येणार आहे. ‘एअरलिफ्ट’, ‘शेफ’ या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या राजाकृष्ण मेनन यांनी या बायोपिकच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे. तर, अभिनेता शाहिद कपूर या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. येत्या काळात शाहिद त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यग्र असल्यामुळे २०१९ मध्ये या बायोपिकच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.

कोण आहे डिंको सिंग ?
मुळच्या मणिपूरच्या असणाऱ्या डिंको सिंगने पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धांमधील बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. २०१३ मध्ये त्याला केंद्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. डिंको काही नवोदित बॉक्सर्सना प्रशिक्षणही देतो. २०१७ मध्ये डिंकोला कॅन्सरचं निदान झालं आणि तेव्हापासून तो मोठ्या धैर्याने या आजाराला लढा देत आहे.

वाचा : सर्वत्र व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मीम्सविषयी राधिकाची प्रतिक्रिया वाचली का?

दरम्यान, डिंकोची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी शाहिद फारच उत्सुक असल्याचं कळत आहे. या चित्रपटाच्या कथानकातून एका अशा खेळाडूविषयी जाणून घेण्याची संधी मिळणार आहे, ज्याच्याविषयी फार कोणालाच माहितीही नाही. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी सुवर्णपदक जिंकणाऱ्या या खेळाडूची संघर्षगाथा नेमकी कशी आहे, हे आता येत्या काळात कळेलच.