अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री डायना पेंटी यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘परमाणू- द स्टोरी ऑफ पोखरण’ या चित्रपटाच्या निर्मात्यांसोबतचा जॉनचा वाद आणखीनच चिघळला आहे. क्रिअर्ज एंटरटेन्मेंटच्या प्रेरणा अरोरा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर जॉन अब्राहम आणि त्याच्या जेए एंटरटेन्मेंट या निर्मितीसंस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रिअर्जतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रकाद्वारे याविषयीची माहिती देण्यात आली. ‘खार पोलीस स्थानकात अभिनेता जॉन अब्राहम आणि जेए एंटरटेन्मेंट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिअर्जच्या प्रेरणा अरोरा यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये फसवणूक, विश्वासघात, पैशांची अफरातफर आणि कॉपीराईटच्या मुद्द्यावरुन जॉन आणि त्याच्या कंपनीविरोधात तक्रार करण्यात आली होती.

खासदारकीच्या शेवटच्या काळात सचिनचा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’, ही बातमी वाचून तुम्हालाही सचिनचा अभिमानच वाटेल

क्रिअर्ज आणि जेए एंटरटेन्मेंट या दोन्ही निर्मिती संस्थांमध्ये असणारे वाद पाहता आता जॉनच्या निर्मिती संस्थेने क्रिअर्जची साथ सोडली आहे. ही सर्व परिस्थिती पाहता खुद्द जॉन येत्या काळात त्याच्या आगामी ‘परमाणू’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नव्याने जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याच्या घडीला प्रेरणा अरोरा आणि जॉन अब्राहम यांच्याच आरोप- प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहे. २०१७ पासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’शी टक्कर होऊ नये यासाठी सर्वप्रथम या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. त्यानंतर या चित्रपटापुढे अनुष्का शर्माच्या ‘परी’चं आव्हान होतं. पण, आता मात्र ४ मे याच तारखेला ‘परमाणू…’ प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जातंय.