बायोपिक अर्थात चरित्रपट. प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा संघर्ष हे समीकरण सध्या बॉलिवूडमध्ये हिट ठरतंय. अशा चरित्रपटांची लाटच सध्या हिंदी सिनेसृष्टीत येत आहे. खेळाडू, राजकारणी, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावरील चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. पण बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात दीपिका पदुकोणला बायोपिकच्या या कथा रटाळवाण्या वाटत आहेत.

चेन्नईतल्या एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूडमधील बदलत्या ट्रेण्डबाबत दीपिकाला तिचं मत विचारलं गेलं. ती म्हणाली, ‘बॉलिवूडमध्ये सध्या खूप सारे बायोपिक साकारले जात आहेत. गेल्या काही महिन्यात मला बऱ्याच बायोपिकच्या ऑफर्स आल्या आणि त्या सर्व उत्तम होत्या. दमदार व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित या बायोपिक होत्या. पण तोच तोच संघर्ष तुम्ही किती वेळा प्रेक्षकांना दाखवणार? रस्त्यावरील सामान्य मनुष्याचा प्रवासही तसाच असतो असं मला वाटतं.’

वाचा : सलमा खान- कतरिना कैफला नेटकऱ्यांनी म्हटलं ‘सासू- सून’; पाहा सलमानची बहीण अर्पिताची प्रतिक्रिया 

‘संजू’, ‘सूरमा’, ‘राजी’, ‘पॅडमॅन’ असे एकाहून एक दमदार बायोपिक यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आले. अजूनही ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’, ‘सुपर ३०’, अभिनव बिंद्रा आणि शकीला यांच्या जीवनावरील चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत.