बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री काजोल यांच्या मैत्रीबाबत सर्वांनाच माहित आहे. या दोघांमध्येही मैत्रीचे अतुट नाते आहे. करणसाठी ‘लकी’ असलेली काजोल त्याच्या चित्रपटात अगदी छोटी का होईना पण ती भूमिका साकारतेच. पण आता करणच्या चित्रपटात काजोलने काम करण्याची प्रथा मोडीत आल्याचे दिसते. त्यांच्या मैत्रीच्या नात्यात आता कडवटपणा आल्याचे चित्र आहे.
यंदाच्या दिवाळीत करणचा ‘ए दिल है मुश्किल’ आणि अजय देवगणचा ‘शिवाय’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर पाहावयास मिळेल. त्यामुळेच या दोन जीवलग मित्रमैत्रिणीच्या मैत्रीवर परिणाम झाला असून त्यांच्या नात्यात कडवटपणा आल्याचे कळते. त्याचाच परिणाम म्हणून करणच्या आगामी ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटात काजोल तिचा ‘सिग्नेचर अपिअरन्स’ देताना दिसणार नाही. मात्र, या चित्रपटात या दोघांचाही जवळचा मित्र असलेला बादशहा शाहरुख खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. शाहरुख या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनच्या नवऱ्याची भूमिका साकारत आहे. ज्याचा कालांतराने मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूनंतरच रणबीर आणि ऐश्वर्या यांच्या प्रेम कथेला सुरुवात होते. ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातून ऐश्वर्या आणि शाहरुख १४ वर्षांनी एकत्र काम करत आहे. याआधी २००२ मध्ये ‘देवदास’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अजय देवगण याने कमाल आर खानवर ‘ए दिल है मुश्किल’च्या प्रमोशनसाठी २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता. करणने त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केआरकेला २५ लाख रुपये दिले आहेत का? याची चौकशी करण्याची मागणी अजयने केली होती. यासंबंधी अजयने एक ऑडिओ ट्विट केला होता. ज्यात केआरके, अजय देवगणचा व्यावसायिक सहकारी कुमार मंगतशी केआरके बोलतो की त्याने करणच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी २५ लाख रुपये घेतले आहेत. या ऑडियोमध्ये कुमार यांच्याकडून खानला असं करु नये असंच सांगण्यात येत होतं. केआरकेने ट्विटरवर अजयच्या ‘शिवाय’बद्दल वाईट बोलले होते आणि करणच्या ‘ए दिल है मुश्किल’ची प्रशंसा केली होती. याबाबतीत जेव्हा कुमार आणि केआरकेचे बोलणे झाले तेव्हा केआरके काही सेकंदासाठी फक्त हसत राहिला. नंतर या गोष्टीवर जोर दिल्यानंतर तो म्हणाला की, ‘करणला पाठिंबा तर द्यावाच लागेल, जो माणूस २५ लाख रुपये देतो त्याला पाठिंबा तर द्यावाच लागणार ना!’