आगामी लोकसभा निवडणुकांच्या काळात सर्वाधिक नागरिकांनी मतदान करावं यासाठी मोदींनी कलाकारांना जनजागृती करण्याचं आवाहन केलं आहे. बॉलिवूडमधल्या कलाकारांना आजची पीढी सोशल मीडियावर सर्वाधिक फोलो करते, त्यांचं अनुकरण करते. या कलाकारांच्या मतांचा प्रभावही जनतेवर होतो. तेव्हा आगामी निवडणुकांच्या काळात सर्वाधिक मतदारांनी मतदान करावं यासाठी मोदींनी कलाकरांना जनजागृती करण्याचं आवाहन सोशल मीडियाद्वारे केलं आहे.

सर्जनशीलता वापरून मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करा. या निवडणुकीत प्रत्येक नागरीकांचा सक्रिय सहभाग असायला हवा. देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी हे पाऊल उचलायलाच हवं असं म्हणत मोदींनी अमिताभ बच्चन, शाहरूख खान, दिग्दर्शक करण जोहरला ट्विट करत ही विनंती केली आहे.

तर मोदींनी सलमान खान आमिर खानला ‘अंदाज अपना अपना स्टाईल’मध्ये नागरीकांना मतदान करण्याचं आवाहन करा अशी विनंती केली आहे. मोदींनी प्रत्येक कलाकारांना वेगवेगळ्या पद्धतीनं आवाहन केलं आहे. आघाडीच्या प्रत्येक कलाकारांसाठी ट्विट करत त्यांनी मतदानाच्या जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावं, असं मोदींनी म्हटलं आहे.

रणवीर सिंग, वरुण धवन, विकी कौशल यांसारख्या युथ आयकॉन असणाऱ्या कलाकारांनाही त्यांनी जनजागृती मोहीमेत सहभागी करू घेतलं आहे. अपना टाइम आ गया है हे मतदारांना सांगण्याची वेळ आली आहे, मतदान केंद्रावर आता हाय जोश असला पाहिजे हे मतदारांना सांगा असा संदेश त्यांनी या तिघांसाठी लिहिला आहे.

दीपिका, आलिया, अनुष्का शर्मा यांना देखील जगजागृती मोहिमेत सहभागी होण्याची विनंती त्यांनी केली आहे. तुमच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी खात्री आहे असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.