देशात सध्या करोना प्रादुर्भावाचा कहर सुरु आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या पाहता देशातली परिस्थिती गंभीर दिसत आहे. अशातच अनेक सेलिब्रिटी प्रशासनावर, व्यवस्थेवर टीका करताना दिसत आहेत. दिग्दर्शक राम गोपाल वर्मानेही एक ट्विट केलं आहे. जे फारच थोड्या वेळात प्रचंड व्हायरल होत आहे. काय आहे हे ट्विट…पाहूया!

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, “करोना परिस्थिती योग्य प्रकारे न हाताळल्याबद्दल सर्व वृत्तवाहिन्या नरेंद्र मोदी यांना वगळून प्रत्येकाची मुलाखत कशी घेऊ शकतात?”

त्यांचा हा सवाल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक लोकांनी त्याच्या ट्विटवर कमेंट्स केल्या आहेत. यापूर्वीही अनेक हिंदी मराठी कलाकारांनी देशातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे.
दिग्दर्शक केदार शिंदेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणतो, “टीव्हीला बाईट देणाऱ्या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते,त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? आणि हवाय कशाला एवढा फौजफाटा? कुणाला दाखवायचा आहे? किंवा मला वाटतं, एवढीच मंडळी आता त्यांच्यासोबत उरली असावीत!”

तर अभिनेता फरहान अख्तरने लसींच्या वाढत्या किमतीवर भाष्य केलं होतं. सोमवारी फरहानने एक बातमी शेअर केली होती. भारत सरकार १मेपासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुलं करणार असल्याने सरकारने सिरम आणि भारत बायोटेक या लस उत्पादक कंपन्यांना लसीचे दर कमी करायला सांगितल्याची ती बातमी होती. त्यावरुन फरहान बराच ट्रोलही झाला होता.