मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने मराठी सिनेसृष्टी सोबतच बॉलिवूडमध्ये विविध सिनेमांमध्ये अभिनय करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. ‘इकबाल’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल’ आणि ‘हाउसफुल’ यांसारख्या अनेक सिनेमांमधून त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून श्रेयस बॉलिवूडपासून दुरावल्याचं पाहायला मिळतंय. यातच श्रेयसने त्याच्या फिल्मी करिअरमधील संघर्षावर भाष्य केलंय. शिवाय बॉलिवूडमधील काही व्यक्तींवर त्याने खळबळजनक आरोप केले आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने बॉलिवूडमधील अनेक गोष्टींचा खुलासा केलेला आहे. ‘इकबाल’ या सिनेमातून श्रेयसने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं मोठं कौतुकही झालं. मात्र त्यानंतर श्रेयसचे मुख्य भूमिका असलेले सिनेमे फारसे चालले नाहीत. मुख्य भूमिका असलेल्या सिनेमांबद्दल म्हणताना श्रेयस म्हणाला की त्याने स्वतःच मार्केटिंग केलं नाही आणि त्यामुळेच त्याला प्रसिद्धी मिळाली नाही .

मुलाखतीत तो म्हणाला, ‘एक सोलो सिनेमा चालत नाही याचा अर्थ इतर सिनेमेही चालणार नाहीत असा नसतो. मी अनेक सोलो सिनेमांध्ये काम केलंय. पण मला वाटतं माझ्यात एक कमी आहे ती म्हणजे स्वत:च मार्केटिंग करण्याची क्षमता. आपल्या कामामुळे आपल्याला आणखी काम मिळेल या विचारसरणीचा मी आहे.

त्या मित्रांनीच पाठीत सुरा खुपसला

पुढे श्रेयसने खळबळजनक खुलासा केला आहे. तो म्हणाला, “मला असं कळालंय की काही अभिनेते माझ्यासोबत स्क्रीन शेअर करणं असुरक्षित समजतात. त्यामुळे मी सिनेमात नसावं असं त्यांना वाटतं. काही मित्रांच्या हितासाठी मी काही सिनेमे केले आहेत. मात्र त्याच मित्रांनी माझ्या पाठीत सुरा खुपसला. माझे काही असेही मित्र आहेत जे पुढे निघून गेले आहेत आणि आता सिनेमा बनवत आहेत. इंडस्ट्रीमध्ये ९० टक्के लोक तुमच्या ओळखीचे असतात आणि फक्त १० लोक असे असतात ते तुमच्या चांगल्या कामावर मनापासून खूप होतात.” असं श्रेयस म्हणाला.

अभिनय करतच मला मरायचंय..

पुढे श्रेयस म्हणाला. “इथे तर अमिताभ बच्चन याच्यासारख्यांना देखील संघर्ष करावा लागला. तर आम्ही कोण आहोत? ते देखील खाली पडले मात्र नंतर पुन्हा नव्या जोमाने त्यांनी झेप घेतली. माझ्यासोबतही तसचं होतंय. जेव्हा मी डिप्रेस असतो तेव्हा मी विचार करतो की मी तो व्यक्ती आहे ज्याने ‘इकबाल’ सिनेमा केलाय. मी अजूनही चांगल्या भूमिकेच्या प्रतिक्षेत आहे. अनेक जण या परिस्थितीतून जातात. ही परिस्थितीच आपल्याला खंबीर बनवते. अभिनय करतच मला मरायचंय.. एखाद्या सेटवर किंवा मंचावर” असं म्हणत श्रेयसने त्याच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.