बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात काही बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे. दरम्यान त्यांच्या या कृतीवर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री याने नाराजी व्यक्त केली. “जेव्हा तुमच्या घरातील प्राणी, मेकअप आणि मुलांच्या बातम्या येत होत्या तेव्हा तुम्हाला काही समस्या नव्हती का?” असा सवाल त्याने कोर्टाचा दरवाजा ठोठावणाऱ्या कलाकारांना केला आहे.

“जेव्हा तुमच्या घरातील कुत्री-मांजरं, त्यांचे कपडे, मेकअप, हॉलिडेज, तुमची मुलं यांच्या पेड बातम्या जेव्हा छापल्या जात होत्या. तेव्हा तुम्हाला खुप चांगलं वाटत होतं. या बातम्या वाचणारे प्रेक्षक आणि चाहते जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारु लागले तेव्हा मात्र तुम्हाला त्रास होऊ लागला. थेट कोर्टाचाच दरवाजा तुम्ही ठोठावला.” अशा आशयाचं ट्विट करुन विवेक अग्निहोत्रीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी अशाच प्रकारची नाराजी अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील व्यक्त केली होती.

दिल्लीतील कोर्टात या चार जणांविरोधात आणि दोन चॅनल्स विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अजय देवगण, करण जोहर, अक्षय कुमार, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर, झोया अख्तर यांच्यासह महत्त्वाच्या प्रॉडक्शन हाऊसेसचा समावेश आहे. द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडिया आणि सिने टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन यांचाही याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. बॉलिवूडमधल्या कलाकारांविरोधात डर्ट, फिल्थ, स्कम, ड्रगीज अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे बॉलिवूडची बदनामी झाली. हे शब्द सिनेसृष्टीसाठी अपमानजनक आहेत असंही या याचिकेत म्हटलं आहे.