गेल्या पंधरा वर्षांपासून टेलिव्हिजन विश्वात साक्षी तन्वर एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नावारुपास आली आहे. तिच्या काही भूमिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. टेलिव्हिजनवरील विविध भूमिकांमधून ती एक अष्टपैलू अभिनेत्री असल्याचे सिद्ध झाले. मग ती ‘कहानी घर घर की’ मधील ‘पार्वती’, ‘बालिका वधू’मधील ‘टिपरी’ किंवा ‘बडे अच्छे लगते है’ मधील ‘प्रिया’ असो. व्यावसायिक जीवनात साक्षी समर्पितपणे काम करते. पण, तिचे खासगी आयुष्यही गुलदस्त्यात आहे. काही दिवसांपूर्वी साक्षीने एका व्यावसायिकाशी लग्न केल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. पण, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत या केवळ अफवा असल्याचे साक्षीने स्पष्ट केले होते. दरम्यान, आमिर खान याच्या बुचर्चित ‘दंगल’ या चित्रपटामध्ये साक्षी तन्वर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे. तर या ‘दंगल’ अभिनेत्रीबद्दलच्या दहा रंजक गोष्टी जाणून घेऊया..

१. साक्षीने तिच्या करियरची सुरुवात सूत्रसंचालक म्हणून केली होती. दूरदर्शनवरील गाण्यांवर आधारित ‘अलबेला सूर मेला’ या कार्यक्रमाचे तिने सूत्रसंलान केले होते.

२. आपल्या सौंदर्याने भुरळ पाडणा-या या टीव्ही अभिनेत्रीने ‘पॉझिटीव्ह थिंकर्स’ या निर्मिती संस्थेत कला दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

३. अभिनयाव्यतिरीक्त तिने दिग्दर्शनातही आपले कौशल्य आजमावले. तिने ‘सन्मान एक अधिकार’ या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले होते.

४. ‘ओरमॅक्स मिडीया’तर्फे झालेल्या एका सर्वेक्षणात फार कमी सेलिब्रिटींचा समावेश होता. त्यात साक्षी तन्वरचे नाव होते.

५. अद्यापही कुमारी असलेल्या या अभिनेत्रीला लग्न म्हणजे दोन व्यक्ती एकमेकांना पूरक असणे असे वाटते.

६. सर्वाधिक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रींमध्ये साक्षीचे नाव येते.

७. साक्षीने तिच्या बेडरुममध्ये आपल्या आईचे फोटो लावले आहेत. जेणेकरून, रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर तिला तिच्या आईची झलक पाहता येईल.

८. एक अभिनेत्री म्हणून बालिका वधूमधील ‘टिपरी’ ही व्यक्तिरेखा तिच्यासाठी फार महत्त्वाची होती, असे साक्षीला वाटते.

९. ‘गाइड’ आणि ‘शोले’ हे साक्षीचे आवडते चित्रपट आहेत.

१०. ट्रेण्ड आणि आपल्याला सोयीस्कर अशा गोष्टींमध्ये समतोल राखण्यावर साक्षी विश्वास ठेवते. तिच्या मते स्टाइल हा एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आमिर खानने दंगल चित्रपटात साक्षीची निवड कशी करण्यात आली यावरुन पडदा उचलला होता. आमिर खानची आई टीव्ही जास्त पाहते, त्यामुळे ‘दंगल’ या चित्रपटामध्ये साक्षीची निवड करण्यासाठी आमिरच्या आईची महत्त्वाची भूमिका आहे असेच म्हणावे लागेल. साक्षीच्या कामातील प्रामाणिकपणा आणि कामाप्रतीची तिची निष्ठा पाहता दिग्दर्शक नितेश तिवारींनीही तिची प्रशंसा केली होती. ‘दंगल’ चित्रपटात कुस्तीपटू गीता आणि बबिता यांच्या आईची भूमिका साकारणारी साक्षी तन्वर येत्या २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.