भयपट अनेक प्रकारे सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत हाताळले जात आहेत. भयभुताचे आकर्षण असल्याने या विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांची कमी नाही हे गेल्या काही वर्षांत भयपटांना मिळालेल्या यशाने सिद्ध केले आहे. अर्थात, अजूनही आपल्याकडे निव्वळ भयपटांपेक्षा कौटुंबिक मनोरंजनाचे समीकरण साधणाऱ्या विनोदी भयपटांची निर्मिती अधिक केली जाते. मात्र, गेल्या वर्षी वशीकरणासारखा विषय हाताळणाऱ्या ‘शैतान’ या हिंदी चित्रपटाला चांगले यश मिळाल्याने या वेळी पुराणप्रथा आणि व्यथा दोन्हींना एकत्र आणत साधलेला भयपट ‘माँ’च्या रूपात अजय देवगणच्या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांसमोर आणला आहे.
‘माँ’चा विचार करताना ‘शैतान’ चित्रपटाचा उल्लेख महत्त्वाचा वाटतो. त्याचं एक कारण म्हणजे दोन्ही चित्रपट एकाच निर्मितीसंस्थेकडून आलेले आहेत. आणि चित्रपट पाहणाऱ्यांनाही हे लक्षात येईल, नाही म्हटलं तरी याही चित्रपटांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तो कसा? हे चित्रपट पाहिल्यावरच लक्षात येईल. निव्वळ भयपट असले तरी दोन्ही चित्रपटांमध्ये विषय आणि तद्अनुषंगाने झालेल्या मांडणीत प्रचंड तफावत आहे.
‘शैतान’ या चित्रपटात वशीकरण हा मुख्य विषय असल्याने वाईट प्रवृत्ती, तंत्र-मंत्र हे सगळं असलं तरी मानवी शक्तीपलीकडची गोष्ट त्यात नव्हती. ‘माँ’ हा पूर्णत: पौराणिक कथेचा आधार घेत उभ्या राहिलेल्या जुन्या प्रथा आणि त्याच्याशी संघर्ष करणाऱ्या नव्या आधुनिक विचाराच्या जोडप्याची ससेहोलपट दाखवणारा चित्रपट आहे. मात्र, यात भयापेक्षा सत् आणि खल प्रवृत्तीतला संघर्ष आहे.
कालिमाता आणि दैत्य यांच्यात आधुनिक काळात होणाऱ्या लढ्यापर्यंत चित्रपट पोहोचतो. आपल्या मुलीला मरणाच्या दारातून सोडवून आणण्यासाठी एका आईने थेट देवीरूपात केलेला संघर्ष आहे. त्यामुळे एका वळणावर वास्तवतेची कास सोडून चित्रपट पुराणकथा, अघोरी शक्ती, अनैसर्गिक शक्ती प्राप्त झालेला राक्षसाच्या रूपातील माणूस अशा भलत्याच काल्पनिक विश्वात शिरतो.
भयपटांची ताकद ओळखून ती पडद्यावर प्रभावीपणे साकारण्याची हातोटी एव्हाना दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी सिद्ध केली आहे. त्यामुळे ‘माँ’ चित्रपटातही त्यांची ही प्रभावी दिग्दर्शकीय मांडणी प्रेक्षकाला पहिल्या दृश्यचौकटीपासून बांधून ठेवते.
कोलकत्त्यात राहणाऱ्या त्रिकोणी कुटुंबापासून ही गोष्ट सुरू होते. जयदेव, अंबिका आणि त्यांची मुलगी श्वेता असं हे सुखी कुटुंब. या कुटुंबाचा भूतकाळ, त्यांचे पूर्वज, मूळ घर, गाव… ही सगळी माहिती जयदेव आणि अंबिकाने श्वेतापासून लपवून ठेवली आहे. मात्र, श्वेताला तिचं गाव चंद्रपूरविषयी प्रचंड कुतूहल आहे. चंद्रपूरला जाण्यासाठी तिने आईवडिलांकडे लकडा लावला आहे, पण तिला नकारघंटाच मिळते. दुर्दैवाने, वडिलांचं निधन झाल्याने जयदेवला अचानक चंद्रपूरला जावं लागतं. आणि पाठोपाठ अंबिकावरही श्वेताला घेऊन चंद्रपूर गाठायची वेळ येते.
जयदेवच्या घराण्याला एक पूर्वापार शाप आहे. आजच्या काळात वावरणाऱ्या जयदेव आणि अंबिकाला हा शाप किंवा त्या घरात चालत आलेली प्रथा यात कुठलंही तथ्य आहे असं वाटत नाही. मात्र, जयदेवच्या या जुन्या घरात पाऊल टाकल्यापासून या घरातली आणि गावातली माणसंही आपल्यापासून काही लपवताहेत याची जाणीव अंबिकाला होते. अंबिका आणि श्वेताच्या येण्याने गावातील राक्षस जागा झाला आहे आणि तो पुन्हा एकदा आमच्या मुलींना घेऊन जाऊ लागला आहे, म्हणत गावकरी तिला दूषणं देऊ लागतात.
राक्षस वगैरे काही नाही, तुम्ही उगाच माझ्या मुलीचा बळी घेऊ पाहात आहात, असे म्हणणाऱ्या अंबिकाच्या डोळ्यासमोर अखेर तो राक्षस श्वेताला घेऊन जातो. आणि मग मुलीला वाचवण्यासाठी अंबिका मुळातून घराण्याला लागलेला शाप, पूर्वापार चालत आलेली प्रथा समजून घेते. रक्तबीज राक्षसाचा अंश असलेल्या त्या खलपुरुषाला नष्ट करण्यासाठी अंबिका कालिमातेचा जागर करते आणि गावाला विशेषत: गावातील मुलींना या शापाच्या जोखडातून मुक्त करते, असं या चित्रपटाचं सर्वसाधारण कथानक आहे.
‘माँ’ या चित्रपटाचं वैशिष्ट्य काही अंशी त्याच्या कथानकात आहे. पुराणात रक्तबीज नावाच्या राक्षसाचा कालिमातेने कसा संहार केला याची गोष्ट आहे. रक्तबीजाला मारलं की त्याचं रक्त जमिनीवर पडून आणखी रक्तबीज निर्माण होत असतं. त्याला समूळ नष्ट करण्यासाठी अखेर देवीला कालीचं भयंकर रूप धारण करावं लागलं. रक्तबीज हे एका दुष्ट, विकृत प्रवृत्तीचं प्रतीक आहे.
राक्षस मेला तरी राक्षसी प्रवृत्ती संपत नाही, त्यासाठी स्त्रीला वारंवार दुर्गा बनून आपल्या अस्तित्वासाठी लढावं लागेल, असा काहीसा विचार चित्रपटात आहे. मात्र हा विचार समर्थपणे न मांडता तो केवळ या भयकथेला तत्त्वाचं अधिष्ठान देण्यापुरता वापरलेला आहे. देवी आणि दैत्यातला संघर्ष व्हीएफएक्सच्या मदतीने उत्तम उभा केला आहे.
वाईट शक्तीचं गावावर असलेलं सावट, राक्षसाचं झाड या सगळ्याकरिता एक वेगळा टोन दिग्दर्शकाने वापरला आहे. भयपटाच्या मांडणीसाठी आवश्यक असलेली दृश्यरचना, टोन, पार्श्वसंगीत या सगळ्याच्या उत्तम वापराबरोबरच बंगालमध्ये दुर्गेला असलेलं महत्त्व, पारंपरिक पद्धतीची कालीपूजा याची उत्तम जोड कथानक प्रभावी करण्यासाठी देण्यात आली आहे.
सर्वसामान्य आई ते प्रसंगी मुलीला वाचवण्यासाठी कालीचं रूप म्हणून राक्षसाशी लढणारी आई हे स्थित्यंतर दाखवण्यासाठी काजोल ही अचूक निवड होती हे पाहताना लक्षात येतं. चित्रपटात अन्य व्यक्तिरेखाही असल्या तरी प्रामुख्याने काजोल, रोनित रॉय अशा मोजक्या कलाकारांभोवती हा चित्रपट फिरतो.
मांडणी आणि तंत्रात सफाईदारपणा असूनही चित्रपट प्रभावी वाटत नाही. आपण काहीतरी नवीन, अचंबित करणारं पाहिलं आहे हा अनुभव चित्रपट पाहताना मिळत नाही. त्यामुळे भयपटांच्या गर्दीत स्त्रीशक्तीचा जागर हा एक वेगळा दृष्टिकोन सोडला तर ‘माँ’ सर्वसाधारण भयपट यापलीकडे मनात उतरत नाही.
माँ
दिग्दर्शक : विशाल फुरिया कलाकार : काजोल, रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता, खेरिन शर्मा.