मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. मात्र, शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला. न्यायालयाचा आदेश प्राप्त करण्यासाठी आर्थर रोड कारागृहातील बेल बॉक्स आज पहाटे ५.३० वाजता उघडण्यात आला. आर्यनला नेण्यासाठी शाहरुख खान जेलबाहेर उपस्थित होता. दरम्यान, साधूचा वेष केलेल्या एका व्यक्तीने मन्नत बाहेर हनुमान चालिसाचा जाप केला असल्याचे दिसले.

साधूच्या वेषातील ही व्यक्ती शाहरुख खान आणि आर्यनसाठी प्रार्थना करत असल्याचे दिसत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या व्यक्तीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही व्यक्ती हनुमान चालिसाचा जाप करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : शाहरुखने दिलेले ४५०० रुपये आर्यन खानने जेलमध्ये कसे केले खर्च? जाणून घ्या

आर्यनच्या जामिनासाठी हायकोर्टाने १४ अटी घातल्या आहेत. आर्यन खान पोलिसांना कळवल्याशिवाय मुंबई सोडू शकणार नाही, त्याला दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल, असे या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. जामीन आदेशानुसार, त्यांना एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक जमा करावा लागेल आणि त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे.

कोर्टाच्या अटींनुसार आर्यनला परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. तसेच आर्यनला अरबाज मर्चंट आणि या प्रकरणातील आरोपींसारख्या मित्रांशी आणि माध्यमांशीही बोलता येणार नाही. आर्यनला शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. न्यायालयीन सुनावणीत उपस्थित राहून आवश्यकतेनुसार तपासात सहकार्य करावे लागेल. न्यायालयाच्या आदेशानुसार, यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन झाल्यास, एनसीबीला जामीन रद्द करण्याची विनंती करण्याचा अधिकार असेल.