Abhishek Bachchan on 20 years of Sarkar Movie : अभिषेक बच्चनने आजवर अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्याने २००० साली आलेल्या ‘रिफ्यूजी’ चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतीच २५ वर्षे झाली आहेत. त्यासह अभिनेत्याच्या अजून एका चित्रपटाला प्रदर्शित होऊन २० वर्षे झाली आहेत आणि तो चित्रपट म्हणजे ‘सरकार’. अभिषेकसाठी हा चित्रपट खास आहे. कारण- त्यामधून त्याने पहिल्यांदाच त्याचे वडील व लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह काम केले होते.
अभिषेकने ‘सरकार’ला प्रदर्शित होऊन २० वर्षे झाल्याच्या निमित्ताने ‘स्क्रीन’शी संवाद साधला. यावेळी त्याने या चित्रपटात त्याच्या वडिलांसह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. अभिषेकला या मुलाखतीमध्ये ” ‘सरकार’ आणि ‘बंटी और बबली’ हे चित्रपट प्रदर्शित होऊन २० वर्षे झाली. त्यामध्ये तुझ्या वडिलांसह काम करण्याचा, त्यांच्याबरोबर पहिला सीन करण्याचा तुझा अनुभव कसा होता?” असा प्रश्न विचारण्यात आलेला.
अभिषेक विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला, ” ‘सरकार’ चित्रपटातून मी पहिल्यांदाच माझ्या वडिलांबरोबर काम केलं होतं. पण ‘बंटी और बबली’ हा चित्रपट ‘सरकार’च्या आधी प्रदर्शित झाला. आम्ही ‘सरकार’साठी सहा दिवस एकत्र काम केलं. वडिलांबरोबर पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर काम केलं तेव्हाचा अनुभव भयंकर होता; पण माझ्या यादरम्यानच्या खूप छान आठवणी आहेत. विशेषकरून आमचे दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांच्याबरोबर काम करताना मजा आली. ते माझे आवडते दिग्दर्शक आहेत आणि तो चित्रपटसुद्धा माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे”.
अभिषेक पुढे अमिताभ बच्चन यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करतानाचा अनुभव सांगत म्हणाला, “मला आठवतंय, रामूने (अभिषेकने दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांचा उल्लेख रामू म्हणून केलाय) मला सीनच्या तालमीसाठी बोलावलं होतं. मला पहिल्या पाच मिनिटांतच समजलं होतं की, मला काय करायचं आहे ते. तो माझ्या वडिलांचा क्लोज-अपचा सीन होता. जिथे ते चहा पीत असताना चहाच्या बशीमधून थेट समोर कॅमेऱ्याकडे पाहतात. कुठलाही संवाद नाही अन् काही नाही. फक्त त्यांची ती एक नजर. त्यामधून मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं”.
अभिषेक बच्चनला याच मुलाखतीमध्ये पुढे “तुझ्या वडिलांच्या अजून एका चित्रपटाला ‘मिली’ला प्रदर्शित होऊन, या महिन्यातच ५० वर्षं पूर्ण झाली आहेत, ज्यामध्ये तुझ्या आईनंदेखील काम केलं होतं. या चित्रपटाच्या तुझ्या काही आठवणी आहेत का,” असा प्रश्न विचारण्यात आला होता. अभिषेक त्यावर म्हणाला, “मी १० वर्षं झाली ‘मिली’ पाहिलेला नाही. मला तो चित्रपट बघायचा आहे. मी लहान असताना माझ्या आईचे चित्रपट पाहत नव्हतो. कारण- मला ते फार भावनिक वाटायचे. त्यामुळे मी माझ्या बहिणीबरोबर ते चित्रपट पाहत असे. पण. तीसुद्धा चित्रपटाच्या शेवटी रडायची आणि इतरांना वाटायचं की, मी तिला काहीतरी केलं म्हणून ती रडतेय”.
अभिषेक पुढे याबाबत म्हणाला, “मी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतल्यानंतर खूप सारे चित्रपट पाहिले. तेव्हा मी ‘मिली’सुद्धा पाहिला होता आणि हा चित्रपट मला खूप चांगला वाटला होता. त्यामधील माझ्या आईचं काम मला खूप आवडलं होतं. पण, मला असं वाटतं की, त्यामध्ये माझ्या वडिलांनी साकारलेली भूमिका खूपच आव्हानात्मक होती. ‘मिली’ हा एक क्लासिक सिनेमा आहे. या चित्रपटाला ५० वर्षं पूर्ण झाली ही खूप मोठी गोष्ट आहे”.