Abhishek Bachchan on his silence about his divorce rumours: बॉलीवूडमधील काही जोडपी कायमच चर्चेत असतात. कतरिना कैफ-विकी कौशल, कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट-रणबीर कपूर, दीपिका पादुकोण-रणवीर सिंह, प्रियांका चोप्रा-निक जोनास ही जोडपी चर्चेत असतात. यामध्ये ऐश्वर्या व अभिषेक बच्चन यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात.
अभिषेक बच्चनने २००७ मध्ये ऐश्वर्या रायबरोबर लग्नगाठ बांधली होती. २०११ ला त्यांना मुलगी झाली. तिचे नाव आराध्या, असे आहे. आराध्या अनेकदा तिच्या आईबरोबर विविध कार्यक्रमांना हजेरी लावते. त्यामुळे हे कुटुंब मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.
आता या सगळ्यात काही काळापूर्वी ऐश्वर्या व अभिषेक यांच्या दुरावा आला असून, ते दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्याबरोबरच बच्चन कुटुंबात आणि ऐश्वर्यामध्ये दुरावा असल्याचे म्हटले जात होते. मात्र, ऐश्वर्या व अभिषेक यांनी यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. त्यानंतर ते आराध्या शाळेतील कार्यक्रमात एकत्र दिसले होते. आता अभिषेक बच्चनने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे.
“माझ्यावर याचा फार परिणाम होत नाही”
अभिषेक बच्चनने ‘ई-टाइम्स’ दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटांच्या चर्चांवर तो कधीच काही का बोलला नाही, यावर वक्तव्य केले. अभिनेता म्हणाला, “याआधी लोक माझ्याबद्दल जे काही बोलायचे, त्याचा माझ्यावर काहीच परिणाम व्हायचा नाही. आज माझं कुटुंब आहे. त्यामुळे अशा अफवांचा त्रास होतो. जर मी काही स्पष्टीकरण दिलं, तर लोक ते वेगळ्या पद्धतीनं इतरांना सांगतात. कारण- नकारात्मक बातम्या विकल्या जातात.
“तुम्ही माझं आयुष्य जगत नाही. ज्या लोकांना मी उत्तरदायी आहे, त्यांना तुम्ही उत्तरदायी नाही आहात. जे लोक अशी नकारात्मकता पसरवतात, त्यांनी त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीनुसार वागलं पाहिजे. माझ्यावर याचा फार परिणाम होत नाही. पण, यामध्ये कुटुंबालादेखील त्रास सहन करावा लागतो.”
पुढे एक उदाहरण देत अभिषेक म्हणाला, “एकदा मी एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर एकानं अश्लील कमेंट केली होती. ती कमेंट पाहिल्यानंतर माझा मित्र सिकंदर खेरला वाईट वाटलं. त्यानं त्याचा पत्ता दिला आणि कमेंट करणाऱ्याला सांगितलं की, हिंमत असेल, तर समोरासमोर येऊन हे बोलून दाखव.”
अभिनेता म्हणाला, “स्क्रीनवर एखाद्याबद्दल वाईट गोष्टी लिहिणं खूप सोईचं आहे. कारण- त्यामध्ये तुम्ही समोरच्याला दिसत नाही हे तुम्हाला माहीत असतं. तुम्ही एखाद्याला दुखावत आहात. जरी त्यांना हे सवयीचं झालं असलं तरी अशा पद्धतीच्या ट्रोलिंगचा त्यांच्यावर परिणाम होतो. तुमच्याशी असं कोणी वागलं, तुमच्याबाबत वाईट गोष्टी लिहिल्या गेल्या, तर तुम्हाला ते आवडेल का? जर माझ्याबद्दल तुम्ही एखादी गोष्ट सोशल मीडियावर बोलणार, लिहिणार असाल, तर ते माझ्या तोंडावर येऊन बोला, असं मला वाटतं. पण, माझ्या तोंडावर येऊन बोलण्याची त्या व्यक्तीची हिंमत होणार नाही. जेव्हा कोणी येऊन माझ्याशी बोलेल, तेव्हा मला वाटेल की, ते जे बोलत आहेत, त्यांना त्याची खात्री आहे. मी त्यांचा आदर करीन.”
अभिषेक बच्चन सध्या कालीधर लापता या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.