Abhishek Bachchan Talks About his Acting Career : अभिषेक बच्चन बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याने २००० साली आलेल्या ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री करीना कपूर झळकली होती. यानंतर त्याने अनेक चित्रपटांतून काम केलं. परंतु, त्याचे वडील व लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे यश मिळवण्यात त्याला अद्याप यश मिळालेलं नाही, असं अनेक जण म्हणताना दिसतात.

अभिषेक बच्चनने नुकतंच एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं आहे. यामध्ये त्याने करिअरच्या सुरुवातीला त्याला फार कोणी ओळखायचं नाही याचं वाईट वाटायचं; परंतु ‘धूम’ चित्रपटानंतर हे चित्र बदललं असं सांगितलं आहे. अभिषेकने ‘द हॉलीवूड रिपोर्टर’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये तो म्हणाला, “प्रत्येक कलाकाराला आपल्याला लोकांनी ओळखावं असं वाटत असतं. ते असं दाखवत नसले तरी आतून त्यांच्या मनामध्ये ही भावना असते.”

अभिषेक पुढे म्हणाला, “आम्ही लहान मुलांसारखे असतो, आमच्यासाठी प्रतिसाद फार महत्त्वाचा असतो. चार चौघांत जर आम्हाला कोणी ओळखलं नाही की याची आम्हाला भीती वाटते. मला असं वाटतं, प्रत्येक कलाकारांनी या दोन्ही परिस्थितीतून गेलं पाहिजे.” पुढे अभिषेक स्वत:चा अनुभव सांगत म्हणाला, “बऱ्याचदा माझ्याबाबत असं झालं आहे की, मी लोकांमधून जात आहे, पण कोणी मला ओळखलेलंच नाही. लोकांना माझ्या असण्याने काही फरक पडला नाही. पण, त्यांना फरक पडावा असं मला अपेक्षित होतं, कारण मी फिल्मस्टार आहे असं वाटायचं.”

अभिषेक पुढे याबाबत सांगताना म्हणतो, “मी या दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत. जेव्हा मला कोणी ओळखायचं नाही तेव्हा वाईट वाटायचं, पण मी ते सहन केलं. मला असं वाटतं, यश मिळण्याआधी अपयशाचा सामना करावाच लागतो.” अभिषेकसह त्याची आई व ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनीदेखील याबाबत वक्तव्य केलं होतं. खालिद मोहम्मद लिखित ‘टु बी और नॉट टु बी’ या अमिताभ बच्चन यांच्यावर आधारित पुस्तकात त्यांनी अमिताभ यांच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.

जया बच्चन म्हणाल्या, “मी अमिताभ बच्चन यांच्या फ्लॉप चित्रपटांकडे कधी फार लक्ष दिलं नाही. कारण मला माहीत होतं, त्यांच्यामध्ये तितकी क्षमता आहे की ते या परिस्थितीचा सामना करतील आणि ही परिस्थिती बदलेल. ते त्यामधून शिकण्याचा प्रयत्न करायचे आणि कधी त्यांनी या गोष्टीचा फार विचार केला नाही. पण, ते कधी कधी म्हणायचे की ते फ्लॉप अभिनेते आहेत. आता अभिषेकसुद्धा असं म्हणतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जया बच्चन अभिषेकबद्दल पुढे म्हणाल्या, “अभिषेकसुद्धा काही वेळेला तो फ्लॉप अभिनेता आहे असं म्हणतो, पण आजही माझं तेच मत आहे की परिस्थिती नंतर बदलते.” अमिताभ बच्चन यांच्यावर आधारित हे पुस्तक २००२ साली प्रदर्शित झालं होतं, तेव्हा अभिषेकला बॉलीवूडमध्ये पदार्पण करून दोन वर्षे झाली होती.