बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. अक्षयने आजवर बॉलीवूडमध्ये अनेक ॲक्शन चित्रपटांत काम केलं आहे. ‘रुस्तम’, ‘स्पेशल २६’, ‘केसरी’, ‘बडे मिया छोटे मिया’, ‘अंगारे’, ‘बॉस’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘सिंग इज किंग’ अशा अनेक ॲक्शन चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. प्रत्येक चित्रपटात अक्षय कुमारचे अतरंगी स्टंट पाहायला मिळतात. त्याच्या या स्टंटमुळेच बॉलीवूडमध्ये त्याला खिलाडी म्हणून ओळखलं जातं.

अक्षयने चित्रपटांत केलेले अनेक स्टंट असेही आहेत, जे पाहताना काळजात अगदी धडकी भरते. अशात आता अक्षयने त्याच्या एका अव्हानात्मक आणि कठीण स्टंटची आठवण सांगितली आहे. ही आठवण सांगताना त्याने दिग्दर्शक किती घाबरले होते हेसुद्धा सांगितलं आहे. नुकतीच अक्षयने ‘द क्विंट’ला मुलाखत दिली. यावेळी त्याला “तुझ्या आतापर्यंतच्या कामात सर्वात आव्हानात्मक स्टंट कोणता होता?”, असं विचारण्यात आलं.

या प्रश्नाला उत्तर देताना अक्षयने १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंगारे’ या चित्रपटाची आठवण सांगितली. या चित्रपटात अक्षयला एका मोठ्या इमारतीवरून छोट्या इमारतीवर उडी मारायची होती. दोन्ही इमारतींच्यामध्ये एक लहान रस्ता होता. चित्रपटाचा हा किस्सा सांगताना अक्षय म्हणाला, “मी एका इमारतीमध्ये सातव्या मजल्यावर उभा होतो. सातव्या मजल्यावरून मला खाली चौथ्या मजल्यावर उडी घ्यायची होती. त्यावेळी दोन्ही इमारतींच्या मध्ये एक लहान रस्ता होता. माझा हा स्टंट होण्याआधीच दिग्दर्शक तेथून पळून गेले.”

अक्षय कुमारने पुढे सांगितलं की, “महेश भट्ट या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. शूटिंग सुरू होते त्यावेळी ते घाबरले होते. त्यांना हा स्टंट पाहण्याची मुळीच इच्छा नव्हती. ‘मला नाही पाहायचं, हा मरेल…’, असं ते म्हणाले होते. तसेच नंतर ते तेथून निघून गेले, त्यामुळे मला हा स्टंट दिग्दर्शकांशिवाय करावा लागला.”

महेश भट्ट दिग्दर्शित अक्षय कुमारचा ‘अंगारे’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हवा तसा चालला नाही. या चित्रपटात अक्षयबरोबर पूजा भट्ट, नागार्जुन आणि सोनाली बेंद्रे या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपटात तगडी स्टारकास्ट असूनही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करू शकला नाही. असे असले तरी याच चित्रपटात अक्षय कुमारने आतापर्यंतचा सर्वाधिक आव्हानात्मक स्टंट केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षय कुमारने १९८७ मध्ये त्याच्या सिनेविश्वातील कामाला सुरुवात केली. त्यानंतर १९९१ मध्ये आलेल्या ‘सौगंध’ या चित्रपटातून तो मुख्य भूमिकेत रुपेरी पडद्यावर आला. अक्षयच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाल्यास, लवकरच तो ‘जॉली एल एल बी ३’, ‘हाउसफूल ५’, ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.