अनुपम खेर यांनी १९७८ मध्ये दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवी घेतली होती. पण त्यानंतर लगेच ते या क्षेत्रात आले नाहीत. पदवी पूर्ण केल्यावर काय करावं या विचारात ते होते. त्याच दरम्यान त्यांनी तीन महिन्यांचा मसाज कोर्स केला होता. काही काळ त्यांनी मसाजचे काम केले. नंतर बरेचदा ते चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या सहकलाकारांनाही मसाज द्यायचे.
“मी माझं शिक्षण पूर्ण केलं होतं. मी दिल्लीतील बंगाली मार्केटमध्ये बसलो होतो. मला नेमकं काय करावं हे कळत नव्हतं. मग मला ओबेरॉय हॉटेलमध्ये मसाज कोर्सची जाहिरात वृत्तपत्रात दिसली. त्यासाठी मी तीन महिन्यांचा मसाज कोर्स केला आणि नंतर दोन महिने मसाजचे काम केले,” असं अनुपम खेर यांनी सांगितलं.
नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ३’ च्या ताज्या भागात अनुपम खेर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी मुकुल आनंद यांच्या १९९१ च्या क्राईम अॅक्शन ड्रामा ‘हम’ सिनेमाच्या सेटवर त्यांच्या सहकलाकारांना मसाज दिल्याची आठवण सांगितली. अनुपम म्हणाले, “डॅनी डेंझोंगपा आणि इतरांना मसाज दिला. नंतर मी मी शिल्पा शिरोडकरच्या आईला मसाज द्यायला सुरुवात केली आणि नेमकी तेव्हाच वीज गेली.”
वीज गेल्यावर काय घडलं?
“मसाज सुरू होता, शिल्पाची आई सतत म्हणत होती, ‘ओह, अनुपम!’ त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले, ‘दादा, वीज लवकर परत घेऊन या’,” असा किस्सा अनुपम खेर यांनी सांगितला. तसेच अमिताभ बच्चन यांना तेव्हा शिल्पा शिरोडकरच्या आईचा आवाज ऐकून लाज वाटत होती, असंही त्यांनी नमूद केलं. यानंतर कपिल शर्माने अनुपम यांची मस्करी केली. शिल्पा शिरोडकरच्या आईला मसाज देण्यासाठीच इतरांना मसाज देत होतात का, असं त्याने म्हटलं. यावर अनुपम खेर यांनी नकार दिला.
‘हम’ चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, गोविंदा, शिल्पा शिरोडकर, डेन्झोंगपा, अनुपम खेर, कादर खान, अन्नू कपूर, विजय खोटे आणि शम्मी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या होत्या. अमिताभ बच्चन व किमी काटकर यांचं लोकप्रिय गाणं “जुम्मा चुम्मा दे दे” याच चित्रपटातलं आहे. शिल्पा शिरोडकरची आई वीणा शिरोडकर या मॉडेल होत्या, त्यांचं २००८ मध्ये निधन झालं.
अनुपम खेर त्यांचे सहकलाकार आणि दिग्दर्शकासह त्यांचा आगामी चित्रपट ‘मेट्रो… इन दिनों’च्या प्रमोशनसाठी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये आले होते. हा चित्रपट ४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरीजने या सिनेमाची निर्मिती केली आहे. अनुराग बसू यांच्या २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाइफ… इन अ मेट्रो’चा हा सिक्वेल आहे. यात नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अली फजल, फातिमा सना शेख, रोहन गुरबक्षानी आणि सास्वता चॅटर्जी हे कलाकार आहेत.