‘कल्की : २८९८ एडी’ ( Kalki: 2898AD ) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजविताना दिसत आहे. प्रदर्शित झाल्याच्या १६ व्या दिवशीदेखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचा आपला दबदबा कायम ठेवला आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताच्या उत्तर भागात अक्षय कुमारचा ‘सरफिरा’ चित्रपट प्रदर्शित झाला असून, दक्षिणेत ‘इंडियन २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, ‘कल्की : २८९८ एडी’ने भारतात १६ व्या दिवशी ५.२ कोटींची कमाई केली आहे. याबरोबरच हा चित्रपट प्रभास ( Prabhash ) च्या पुनरागमनासाठी महत्वाचा मानला जात आहे.

‘नाग अश्विन’ दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात आतापर्यंत ५४८ कोटी रुपयांची कमाई केली असून, शनिवारी हा आकडा ५५० कोटींचा टप्पा पार करील आणि रविवारी रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने भारतात केलेल्या ५५३ कोटींचा विक्रम मोडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

‘कल्की: २८९८ एडी’ चित्रपटातून प्रभासचे पुनरागमन

हा चित्रपट प्रभास ( Prabhash ) साठी महत्त्वाचा ठरला आहे. या लोकप्रिय अभिनेत्याला काही काळापासून सतत अपयशाचा सामना करावा लागत होता. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली २ : द कन्क्लुजन’ या चित्रपटानंतर ‘सालार’चा अपवाद सोडता, त्याला सतत अपयशाला सामोरे जावे लागत होते. मात्र ‘कल्की : २८९८ एडी’ चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे.

चित्रपटाच्या कथानकाविषयी बोलायचे तर, विष्णूच्या दहाव्या अवताराची ही गोष्ट असून, विज्ञान आणि पौराणिक कथेचा योग्य संगम या चित्रपटात दाखविल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी या चित्रपटाचे कौतुक केल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले आहे. हा चित्रपट विविध भाषांत प्रदर्शित झाला असून, तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने आतापर्यंत २५५ कोटी, तर हिंदी भाषेत २३६ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या जागतिक स्तरावरील कमाईविषयी बोलायचे, तर ‘कल्की’ने हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून, गेल्या वर्षी किंग खानच्या ‘पठाण’ व ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांनी जागतिक स्तरावर हा टप्पा ओलांडण्यात यश मिळविले होते.

हेही वाचा : ‘बाई गं’ सिनेमाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, Swapnil Joshi च्या चित्रपटाने कमावले फक्त ‘इतके’ लाख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कल्की : २८९८ एडी’ चित्रपट नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केला असून, या चित्रपटात दीपिका पदुकोण, कमल हासन, अमिताभ बच्चन, प्रभास, दिशा पटानी, मृणाल ठाकूर, दुलकिर सलमान, विजय देवरकोंडा या दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. कमल हासन यांचा ‘इंडियन २’ व अक्षय कुमारचा ‘सरफिरा’ या चित्रपटांमुळे ‘कल्की’च्या कमाईत घट होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.