‘शोले’ चित्रपट आठवला की, पांढऱ्या कपड्यांतील शाल पांघरलेला हात नसलेला ठाकूर आठवतोच ना? जय, वीरू, बसंती, राधा या पात्रांबरोबरच ठाकूर आठवतोच. ठाकूरची भूमिका साकारणारे अभिनेते संजीव कुमार हे आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध होते. मात्र, अगदी कमी वयात त्यांनी जास्त वयाच्या भूमिका का साकारल्या, असा प्रश्न अजूनही अनेकांना पडतो. ७ जुलै १९३८ ला जन्मलेल्या या अभिनेत्याचा मृत्यू वयाच्या ४७ व्या वर्षी झाला तेव्हा संजीव कुमार यांना त्यांचे भविष्य समजले होते का? असे वाटले होते.
संजीव कुमार यांच्यावर आधारित लिहिलेल्या ‘संजीव कुमार : द अॅक्टर वुइ ऑल लव्हड’ या पुस्तकात परेश रावल यांनी अभिनेत्याच्या मॅनेजरबरोबर साधलेल्या संवादाची आठवण मांडली आहे. जमनादास यांनी त्या संवादादरम्यान असे म्हटले होते की, अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका कोणी साकारू शकतं तर ते फक्त संजीव कुमारच आहेत. त्यामुळेच संजीव कुमार यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘शोले’शिवाय ‘त्रिशूल’, ‘मौसम’ , ‘सवाल’, ‘देवता’ या चित्रपटांत जास्त वय असणाऱ्या भूमिका साकारल्या होत्या. ‘शोले’मध्ये जेव्हा त्यांनी ठाकूरची भूमिका साकारली होती तेव्हा ते फक्त ३७ वर्षांचे होते आणि जेव्हा त्यांनी आर. के. गुप्ता यांच्या ‘त्रिशूल’ चित्रपटात अमिताभ बच्चन व शशी कुमार यांच्या वडिलांची भूमिका निभावली होती तेव्हा ते फक्त ४० वर्षांचे होते.
चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकांना हा प्रश्न पडतो की, त्यांनी इतक्या कमी वयात इतक्या मोठ्या वयाची पात्रं का साकारली? कारण- अनेक कलाकार आपल्या वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या भूमिका साकारण्यास नकार देतात. ‘अलिबाबा और चालीस चोर’ चित्रपटात संजीव कुमार यांच्याबरोबर काम केलेल्या दिवंगत अभिनेत्री तबस्सुम आणि इतर अनेक कलाकारांनी असे म्हटले होते की, संजीव कुमार यांना जास्त वयाच्या भूमिका करणे खूप आवडायचे. ते त्या भूमिका करण्यासाठी वेडे होते.
हेही वाचा: “कधी उशीर झाला तर…” , ८१ वर्षांच्या अमिताभ बच्चन यांच्या शिस्तीचे फिटनेस ट्रेनरने केले कौतुक
तब्बसुम टॉकीजमध्ये संजीव कपूर आले होते, तेव्हा तब्बसुम यांनी त्यांना विचारले होते की, तुला मोठ्या वयाच्या भूमिका इतक्या जास्त का आवडतात? त्यावर त्यांनी असे म्हटले होते, “तब्बसुम एका ज्योतिषानं माझा हात वाचून मी जास्त काळ जगणार नाही. मी माझं म्हातारपण पाहू शकणार नाही, असं भविष्य वर्तवलं होतं. त्यामुळे जे आयुष्य मी जगू शकणार नाही, ते मी चित्रपटातून जगून घेतो.”
सचिन पिळगावकर यांनीदेखील संजीव कुमार यांच्याबरोबर काम केले आहे. ‘बॉलीवूड आज और कल’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, संजीव कुमार यांना हिंदीतील जे पहिले काम मिळाले होते, ती भूमिकादेखील म्हाताऱ्या माणसाची होती. शबाना आजमी यांची आई शौकत आजमी यांच्या पतीची भूमिका त्यांनी साकारली होती. कदाचित त्यामुळेच लोकांनी हे जाणले होते की, ही व्यक्ती विशीत असतानादेखील म्हाताऱ्या माणसाची भूमिका सहजतेने निभावू शकते. त्याआधी त्यांनी गुजरातीमध्ये भरपूर काम केले होते, असे सांगितले होते.
संजीव कुमार यांना जी भूमिका दिली जायची, ती भूमिका ते तितक्याच खुबीने निभावत असत. त्यांच्या अभिनयाची वेगवेगळी रूपे ‘अंगूर’, ‘कोशिश’, ‘खिलौना’, ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटांतून पाहायला मिळतात. १९७४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नया दिन नयी रात’ चित्रपटात त्यांनी नऊ भूमिका साकारल्या होत्या. एकाच वेळी इतक्या भूमिका साकारणारे ते पहिलेच कलाकार होते. दरम्यान, आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराने वयाच्या ४७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.