बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ आता आपल्यात राहिले नाहीत. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाला निरोप दिला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि अनेकदा त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधानानंतर त्यांचे फॅन्स त्यांना मिस करत आहेत. तसंच बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. दिलीप कुमार यांची मधुबालासोबत असलेल्या बॉण्डिंगची चर्चा आजच्या पिढीमध्ये सुद्धा होताना दिसून येतेय. याचं कारणं त्या दोघांमधलं अपार प्रेम होय. त्या दोघांच्या नात्याचा शेवट जरी गोड झाला नाही तरी त्यांच्या नात्यातील काही गोड-कडू आठवणी अजूनही जिवंत आहेत.

दिलीप कुमार आणि मधुबाला यांची लव्हस्टोरी १९५१ रिलीज झालेल्या ‘तराना’ चित्रपटातून सुरू झाली. दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि पहिल्याच नजरेत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मधुबालाने तर तिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी दिलीप कुमार यांच्या मेकअप रूममध्ये एक गुलाब पाठवून सोबत चिट्ठी सुद्धा लिहिली होती. या चिट्ठीमध्ये लिहिलं होतं की, “जर तुम्ही माझं प्रेम स्विकारलं असेल तर हा गुलाब तुमच्याजवळ ठेवा….” हे वाचून दिलीप कुमार यांनी चेहऱ्यावर हास्य फुलवत मधुबालाच्या प्रेमाचा स्विकार केला. या दोघांमधलं प्रेम दिवसेंदिवस इतकं वाढू लागलं होतं की, अनेकदा दिलीप कुमार स्वतःच्या चित्रपटाचं शूटिंग सोडून त्या ठिकाणी जात होते, ज्या ठिकाणी मधुबालाच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असायचं.

dilip-kumar-death-madhubala-love-story-2
(Photo: Indian Express archive)

 

जेव्हा नात्यात अडचणी येऊ लागल्या….

दोघांच्या प्रेमाच्या गोड नात्यात अडचणी तेव्हा आल्या जेव्हा त्यांच्या स्टोरीमध्ये मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांची एन्ट्री झाली. वडील अलाउल्ला खान हे त्यांची मुलगी मधुबालावर करडी नजर ठेवून असायचे. इतकं की त्यांच्या हस्तक्षेपामुळे अनेकदा मधुबालाच्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुद्धा वैतागत असत. जेव्हा बीआर चोपडा यांनी मधुबाला आणि दिलीप कुमार या दोघांना घेऊन ‘नया दौर’ चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं, त्यानंतर दोघांच्या लव्हस्टोरीत एक ट्वीस्ट आला. बीआर चोपडा यांना या चित्रपटासाठी दिलीप कुमार आणि मधुबालासोबत भोपाळमध्ये आउटडोअर शूटिंग करायचं होतं. पण यासाठी मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांनी परवानगी दिली नाही. दिलीप कुमार आणि मधुबाला या दोघांमधल्या वाढत्या रोमान्सच्या भितीनेच तिच्या वडिलांनी आउटडोर शूटिंगसाठी परवानगी दिली नाही, असं त्यावेळी बोललं जात होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधुबालाच्या वडिलांसमोर अखेर बीआर चोपडा यांनी सुद्धा हार मानली आणि चित्रपटासाठी मधुबालाच्या ऐवजी वैजयंतीमाला हिला साइन केलं. त्यानंतर वर्तमानपत्रात मधुबालावर कात्री मारल्याचे फोटोज छापून आले. तिच्या या फोटोंच्या बाजुलाच आणखी एक फोटो छापून आला होता तो वैजयंतीमालाचा होता. याला उत्तर देण्यासाठी मधुबालाच्या वडिलांनी मधुबालाच्या सर्व चित्रपटांची नाव टाकून त्याखाली ‘नया दौर’च्या नावापूढे कात्री मारून हा फोटो वर्तमानपत्रात छापून आणला. हे प्रकरण आणखी पुढे वाढलं आणि कोर्टात कायद्याच्या चौकटीत पोहोचलं. त्यानंतर न्यायलायत जेव्हा या प्रकरणावर सुनावणी झाली तेव्हा दिलीप कुमार यांनी आपली बाजू मांडताना कोर्टाला सांगितलं, “होय, मी मधुबालावर प्रेम करतोय आणि करत राहणार…” पण या दोघांच्या नात्यामध्ये चढ-उतार हे सुरूच राहिले. नंतर एक दिवस असा आला, ज्या दिवशी त्यांच्या प्रेमाची नौका सांभाळता सांभाळता नात्यातल्या खाऱ्यापण्यात डुबून गेली आणि त्यांच्या प्रेमाचा अंत झाला.

या दोघांनी पुढे जाऊन ‘मुघल इ आझम’चं शूटिंग तर केलं. पण एकमेकांसोबत बोलणं त्यांनी बंद केलं. त्यानंतर दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांची लाईफपार्टनर म्हणून निवड केली त्यांच्यासोबत संसार सुरू केला.