काही दिवसांपूर्वी करोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणाऱ्या २६ वर्षीय अभिनेत्रीला, शिखा मल्होत्रा हिला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिला अर्धांगवायूचा झटका आला. शिखाला मुंबईमधील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे शिखाच्या शरीराचा डावा भाग काम करत नसल्याचे शिखाची मॅनेजर अश्विनी शुक्लाने सांगितले होते. शिखाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे तिला केईएम हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्यात आले.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार शिखाने तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. ‘मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहे. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचा पाठींबा हवा आहे. माझ्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. पण मी पुन्हा कधी चालू शकेन मला माहिती नाही’ असे शिखा म्हणाली आहे.
View this post on Instagram
शिखाने वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि दिल्लीमधील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये २०१४ मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेतले आहे. मात्र, शिक्षणानंतर तिने अभिनय क्षेत्रात नशीब आजमावले. तिने शाहरुख खानच्या ‘फॅन’, तापसी पन्नूच्या ‘रनिंग शादी डॉट कॉम’ आणि संजय मिश्रा यांच्या ‘कांचली’ या चित्रपटात काम केले आहे. परंतु, करोना काळात रुग्णांची सेवा करण्यासाठी ती पुन्हा एकदा तिच्या मूळ क्षेत्राकडे वळल्याचे पाहायला मिळाले.