राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. अधिवेशनाला राज्यपाल विद्यासागर राव यांचे अभिभाषण मराठीऐवजी गुजराती भाषेत ऐकू आल्याने विरोधक संतप्त झाले. विरोधकांनी अभिभाषण सुरू असतानाच जोरदार घोषणाबाजी केली. अखेर नमते घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माफी मागितली. या संपूर्ण प्रकरणावर विरोधकांची टीका होत असतानाच आता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही एक खोचक सवाल केला आहे.

‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याचे गुजराती व्हर्जन उपलब्ध आहे का, असा उपरोधिक प्रश्न त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे. सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. या सगळ्या प्रकारानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर महेश मांजरेकर यांनी हे ट्विट केले. या ट्विटला रिप्लाय देताना काहींनी गाण्याचे गुजराती अनुवाददेखील उपरोधिकपणे पोस्ट केले. तर आणखी काही दिवस थांबा, सरकार त्याचीही सोय करेल, असे ट्विट एका युजरने केले.