रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्त्री शिक्षणाचे प्रणेते, जातिभेदाच्या भिंती दूर सारत शोषितांच्या मुलांना शिक्षणाची कवाडं खुली करून देणारे महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य इतपतच मर्यादित नाही. थोर व्यक्ती अंगी थोरपणा घेऊनच जन्माला येत नाहीत. सर्वसामान्यांसारखंच त्यांचंही आयुष्य असतं, मात्र योग्य वेळी योग्य विचार देणाऱ्या व्यक्ती, पुस्तकं त्यांच्या आयुष्यात येतात. पटलेला विचार कृतीत आणण्याचं धाडस, कोणाचीही तमा न बाळगता योग्य विचार आणि कृती सातत्याने करत राहण्याचा ध्यास यातूनच कार्य उभं राहतं, समाज घडत जातो. एका महात्म्याच्या आयुष्याचा वेध घेताना त्याची जडणघडण कशी झाली? शिक्षणामुळे मिळालेले विचार आणि स्वत:च्या सखोल निरीक्षण-अभ्यासातून त्याने कमावलेले विचार समाजात कसे झिरपत गेले याचे अत्यंत सहज आणि वास्तवदर्शी पद्धतीने केलेले चित्रण ‘सत्यशोधक’ या चित्रपटात पाहायला मिळते.

हेही वाचा >>> Ole Aale Movie Review : खुसखुशीत भावपट

नीलेश जळमकर लिखित, दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ चित्रपटाची सुरुवातच पुण्यातील एका सुस्थितीतील कुटुंबाच्या वाडयातील विवाह सोहळयाने होते. तेरा वर्षांचा जोती आणि सावित्री या दोन शाळकरी वयातील मुला-मुलीचा विवाह. पती-पत्नी या नात्यापेक्षा या विवाहातून जुळून येते ती मैत्री. जोतीची हुशारी, त्याचा चुणचुणीतपणा लपत नाही. मिशनरी शाळेत शिकणाऱ्या जोतीचे मित्र उच्चवर्णीय आहेत. या शाळेत कुठलीही जातपात त्यांच्या मैत्रीच्या आड येत नाही. मात्र शाळेच्या बाहेर पहिल्यांदाच ज्योतीला आपण उच्चवर्णी नाही याचा साक्षात्कार होतो. उच्च-नीच या त्याच्या मनाला तोवर न शिवलेल्या विचाराने त्याच्या आयुष्यात प्रवेश केल्यानंतर आलेली अस्वस्थता, सगळयांपासून एकाकी पडलेल्या जोतीच्या हातात थॉमस पेन लिखित ‘राइट्स ऑफ मॅन’ नावाचं पुस्तक पडतं. शिक्षणच मनातील अंधार दूर करू शकतं, याची पहिली प्रचीती घेतलेल्या जोतीचा जोतिबांपर्यंतचा प्रवास सुरू होतो. इथे फक्त जोतिबा फुल्यांचा जीवनप्रवास उलगडतो असं नाही तर मुळात शेवटच्या पेशव्यांच्या काळातही मिशनरी शाळेतून एकत्र शिकणाऱ्या या मुलांचे विचार कसे होते? जातीभेदापलीकडे असलेली त्यांची मैत्री तत्कालीन समाजव्यवस्थेचे वास्तव लक्षात आल्यानंतर त्यांच्यात आलेला दुरावाही विचारांच्या-शिक्षणाच्या मदतीने कसा दूर झाला? शोषितांसाठी शाळा सुरू करताना हेच जोतिबांचे शाळकरी सवंगडी कसे त्यांच्याबरोबर होते आणि तरीही एका वळणावर सुशिक्षित मित्रांमध्येही धार्मिक-सामाजिक मतवैविध्यांमुळे पडलेले अंतर हे पैलू गोष्टीच्या ओघात प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न लेखक – दिग्दर्शक नीलेश जळमकर यांनी केला आहे.

हेही वाचा >>> Video : “पुणे तिथे काय उणे…”, माधुरी दीक्षितचा मराठी उखाणा ऐकून पती श्रीराम नेने म्हणाले…

चरित्रपट करताना कोणत्याही थोर पुरुषाचे समग्र आयुष्य त्यात एकवटणं हे अशक्यप्राय काम. त्यामुळे नुसत्याच घटना न मांडता त्यातून नेमकं काय लक्षात घ्यायला हवं याचा विचार करत नीलेश जळमकर यांनी चित्रपटाचे कथालेखन केलं आहे. अगदी मोजक्या आणि महत्त्वाच्या घटनांची मांडणी करत जोतिबांचे विचार प्रत्यक्ष शोषितांसाठी करत असलेल्या कार्यातून, त्यांच्याबरोबरच्या वावरातून कसे बदलत गेले? याचं यथोचित चित्रण जळमकर यांनी केलं आहे. शुद्रातिशुद्र हा भेदाभेद या तळागाळातील समाजाच्या विकासात अडसर कसा ठरतो आहे? त्यासाठी त्या त्या समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम उच्चवर्णीयांकडून कशा पद्धतीने केलं जातं आहे? हे वेळोवेळी सांगण्याचं काम जोतिबांनी केलं. विधवांचं केशवपन, देवदासी प्रथा, सतीची प्रथा बंद झाल्यावरही घरच्याच पुरुषांकडून होणारं विधवा स्त्रियांचं लैंगिक शोषण, विधवा विवाहास मान्यता नसल्याने शारीरिक गरजांपोटी या शोषणाला बळी पडणाऱ्या स्त्रिया, त्यातून जन्माला येणाऱ्या मुलांच्या माथी लिहिलेलं मरण वा अनाथपण अशा कित्येक समस्या ओळखून त्यावर उपाय करणारे जोतिबा आपल्याला दिसतात. जोतिबांच्या विचारांशी एकरूप झालेल्या सावित्रीबाईंनी त्यांना प्रत्येक पावलावर दिलेली साथ, केवळ शिक्षण नव्हे तर अर्थबळही या वर्गाला हवं म्हणून त्यांच्यासाठी व्यवसाय सुरू करत स्वावलंबी अर्थकारणाला त्यांनी दिलेली चालना, वैचारिक मतभेदांमुळे सत्यशोधक समाजाचं अर्धवट राहिलेलं काम आणि तरीही आपला सत्य धर्माचा विचार पोहोचवण्यासाठी ज्योतिबांनी केलेलं लिखाण असे कित्येक पैलू या चित्रपटातून उलगडले आहेत.

अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी ज्योतिबांचा चेहरा, त्यांची विश्वासपूर्ण देहबोली, त्यांचे करारी विचार, अन्यायाची चाड असलेलं निगर्वी व्यक्तिमत्त्व असे कित्येक पैलू आपल्या समर्थ अभिनयातून प्रभावीपणे उलगडले आहेत. सावित्रीबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनीही त्यांना यथोचित साथ दिली आहे.  जोतिबाच्या भूमिकेतील बालकलाकारानेही खूप सुंदर काम केलं आहे. रवींद्र मंकणी, अमोल बावडेकर, अनिकेत केळकर असे कित्येक परिचयाचे आणि काही अनोळखी कलाकारांचे चेहरेही या चित्रपटातून एका वेगळयाच भूमिकेतून पाहायला मिळतात. शेवटी व्यक्ती मरते, विचार मरत नाहीत हा जोतिबांचा सार्थ विचार प्रेक्षकांसमोर ठेवतानाच प्रत्येक चांगला विचार, चळवळ समाजात कशी रुजत जाते, पुढे जात राहते हे मांडण्याचा उत्तम प्रयत्न ‘सत्यशोधक’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.

सत्यशोधक

दिग्दर्शक – नीलेश जळमकर कलाकार – संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडे, रवींद्र मंकणी, अमोल बावडेकर, अनिकेत केळकर, गणेश यादव, सिद्धेश झाडबुके.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie review satyashodhak director nilesh jalamkar zws
First published on: 07-01-2024 at 03:06 IST