नायक असो किंवा खलनायक… आपल्या बहारदार भूमिकांनी मराठीसह हिंदी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे दिग्गज अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आजवरच्या कारकिर्दीत अशोक सराफांनी याने नाटकं, चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि हा वसा ते आजही चालवत आहेत. आजवरच्या कामाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार मिळाला होता. ‘महाराष्ट्र भूषण’नंतर नुकताच त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला.
अशोक सराफांचा बराच मोठा चाहता वर्ग आहे आणि याच चाहत्यांच्या प्रेमामुळे अशोक सराफ एका मोठ्या संकटातून बचावले होते. १९८७ साली अशोक सराफ यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता; त्यामुळे मी या अपघातातून सुखरूप बचवलो नाही तर हा माझा पुनर्जन्मच झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अशातच या भयानक प्रसंगाबद्दल त्यांची पत्नी व अभिनेत्री निवेदिता यांनी एक आठवण सांगितली आहे.
‘मराठी मनोरंजन विश्व’ला दिलेल्या मुलाखतीत निवेदिता यांनी असं सांगितलं की, “१९८८ मध्ये जेव्हा अशोक सराफांचा अपघात झाला होता. तेव्हा सोशल मीडिया वगैरे नव्हता किंवा मोबाइल फोन्स वगैरे नव्हते. तर त्यावेळी महाराष्ट्राच्या कोपऱ्या-कोपऱ्यातून लोकांनी अशोक सराफांसाठी नवस केले होते आणि हे नवस फेडण्यासाठी आमचं जवळजवळ वर्ष गेलं होतं. तेव्हा एक माणूस तर कोल्हापुरहून मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात चालत आला होता.”
यापुढे त्या म्हणाल्या, “अशोक सराफांना महाराष्ट्रातील जनतेनं इतकं प्रेम दिलं आहे की, या प्रेमाचे आम्ही कधीच उतराई होणार नाही. महाराष्ट्र भूषण आणि त्यानंतर पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर सगळ्यांकडून खूपच प्रेम मिळत आहे. हे फार महत्त्वाचं आहे. बाकी सगळं येतं जातं. प्रसिद्धी, पैसा किंवा लोकप्रियता या गोष्टी येतात आणि जातात. पण सगळ्यांचं प्रेम हे खुप मौल्यवान आहे आणि यासाठी अशोक सराफ खूपच भाग्यवान आहे.”
अशोक सराफ यांचा नुकताच (४ जून रोजी) वाढदिवसही साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त निवेदिता यांनी एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं, “तुला पती म्हणून लाभणं हीच माझी मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुझ्या आयुष्याच्या प्रवासाचा मी एक भाग आहे, याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. तू एक महान मुलगा, भाऊ, पती आणि वडील आहेस आणि त्याहूनही मोठं म्हणजे तू एक चांगला माणूस आहेस.”
दरम्यान, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ दोघेही सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशोक सराफ हे कलर्स मराठीवरील ‘अशोक मा.मा.’ मालिकेत पाहायला मिळत आहेत. तर निवेदिता सराफ या स्टार प्रवाहवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. दोघांचाही प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.