प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याचा ‘वाळवी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या चित्रपटातील कलाकारांची नावं आणि पोस्टर वगळता इतर कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल खूपच उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. पण आता दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी त्याला ट्रेलरमध्ये न दाखवण्याचं ठरवलं आहे एवढंच नाही तर त्याच्याबद्दल, ‘तू तर ट्रेलरमध्येही दिसू नकोस’ असं वक्तव्य केलं आहे.
सुबोध भावेने काही दिवसांपूर्वीच एका पोस्टमधून आगामी चित्रपटाची झलक दाखवली होती. त्याने ‘वाळवी’ चित्रपटातील त्याचं पोस्टर शेअर केलं होतं. ज्यात त्याच्या एका हातात अगरबत्ती आणि एका हातात वेफर्स आणि तो वरती बघत आहे असं दिसत होतं. त्याने पोस्टला, “एका हातात अगरबत्ती आणि एका हातात वेफर्स, सुबोध भावे नक्की करतोय तरी काय?” असं कॅप्शन दिलं होतं. त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अशात आता दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
आणखी वाचा- हातात अगरबत्ती आणि वेफर; सुबोध भावे नक्की करतोय तरी काय? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये परेश मोकाशी चित्रपटातील कलाकारांना एक व्हिडीओ दाखवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ म्हणजे आगामी चित्रपट ‘वाळवी’चा ट्रेलर आहे. पण ते अर्ध्यातच लॅपटॉप बंद करतात आणि म्हणतात, “बस्स आपल्याला एवढंच दाखवायचं आहे ट्रेलरमध्ये.” पण तिथे असलेले कलाकार मात्र त्यांना आपले डायलॉग आणि सीन्स त्यामध्ये असायला हवेत असं सांगतात. ज्यात सुबोध भावेही आहे. जेव्हा परेश मोकाशी यांना सुबोध त्याच्या डायलॉगची आठवण करून देतो तेव्हा ते गंमतीने त्याला म्हणतात, “तू तर ट्रेलरमध्येही दिसू नकोस. कारण असं केलं तर माझा चित्रपट काय आहे हे सर्वांसमोर येईल.”
आणखी वाचा- सुबोध भावेने पत्नीबरोबर ट्रेंडिंग म्युझिकवर धरला ताल; व्हिडीओ व्हायरल
परेश मोकाशी यांच्या या स्पष्टीकरणावर सगळे कलाकार हसू लागतात आणि त्यांच्या या निर्णयाला सहमती दर्शवतात. दरम्यान या चित्रपटात सुबोधच्या बरोबरीने स्वप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि. व चि. सौ. का.’ अशा वेगवेगळ्या धाटणींच्या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. आता ‘वाळवी’ हा आगळा वेगळा चित्रपट ते प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ पासून प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओने चित्रपटाची निर्मिती केली आहे.