Priya Bapat : प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. सध्या दोघंही एकत्र ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात काम करत आहेत. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. प्रियाने आजवर मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा सगळ्या माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. तर, उमेश सिनेमांपेक्षा मालिका अन् नाटकांमध्ये प्रेक्षकांना जास्त झळकताना दिसतो. याबाबत अभिनेत्रीला अमोल परचुरेंच्या कॅचअपच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला.

प्रिया बापट म्हणाली, “उमेशच्या कामाच्या बाबतीत सांगायचं झालं, तर त्याची निवड ही प्रत्येक वेळेला वेगवेगळी असते. मी खरंच मनापासून सांगते, कारण गेल्या अनेक वर्षांपासून मी त्याचं काम बघत आलेय… त्याला टेलिव्हिजन आणि नाटकांमध्ये ज्या विश्वासार्हतेने पात्र दिली गेली आहेत. तितक्या विश्वासाने त्याला सिनेमातली पात्र दिली गेली नाहीत. यामागचं कारण मला कधीच समजलेलं नाहीये. मला नाही माहिती की, मी हे बोललं पाहिजे की नाही पण, तो मराठी इंडस्ट्रीतला अंडररेटेड अभिनेता आहे. त्याने नाटकामध्ये स्वत:साठी प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग कमावला आहे. त्यांचं संपूर्ण श्रेय उमेशचं आहे.”

हेही वाचा : सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

उमेशला घेऊन सिनेमा का करावासा वाटत नाही?

अभिनेत्री पुढे म्हणाली, “उमेशच्या काम करण्याच्या क्षमतेवर इंडस्ट्रीत सुद्धा कोणालाच शंका नसावी. इतकं तो छान काम करतो. त्याच्यात प्रचंड क्षमता आहे पण, सिनेमासाठी तो नेहमी अंडररेटेड राहिला. मला माहिती नाही का… त्या प्रकारचे सिनेमे त्याला कधी ऑफरच नाही झाले, तशा भूमिका त्याच्याकडे आल्याच नाहीत. मी आणि उमेश याबद्दल नेहमीच चर्चा करतो…की यामागचं कारण काय? जे मेकर्स आहेत त्यांना उमेशला घेऊन सिनेमा का करावासा वाटत नाही? मला असं वाटतं की, यावर आपण विचार केला पाहिजे. नेहमी प्रेक्षक येत नाहीत असं आपण बोलू शकत नाही.”

हेही वाचा : मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलाकार म्हणून प्रियाने मांडलं मत

“मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्रात बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे समोरच्या चित्रपटाच्या तोडीसतोड जर मराठी सिनेमा असेल, तरच प्रेक्षक स्वत:हून जाऊन आपला चित्रपट पाहणार. पण, हे नाटकाच्या बाबतीत घडत नाही. साऊथमध्ये चित्रपट हे सांस्कृतिक माध्यम आहे अगदी तसंच मराठीमध्ये नाटक हा आपल्या संस्कृतीचा एक भाग झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक नाटकाला येतात. पण, एक गोष्ट जरुर सांगेन, ज्याप्रकारच्या संहिता आपण मराठी इंडस्ट्रीत आजच्या काळात पाहिल्या पाहिजेत, ज्या प्रकारच्या सिनेमॅटिक लँग्वेजमध्ये आपण आपला सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला पाहिजे तसं सगळं होत नाहीये. हे माझं एक कलाकार म्हणून आणि या इंडस्ट्रीचा भाग म्हणून अत्यंत प्रामाणिक मत आहे.” असं प्रिया बापटने स्पष्ट केलं.