Sonali Kulkarni Dance Video : ‘वो लडकी है कहा…’ या गाण्याचं नाव जरी घेतलं तरीही डोळ्यासमोर येते ती मराठीसह बॉलीवूड कलाविश्व गाजवणारी सो-कूल अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सध्या सोशल मीडियावर संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. आता सोनालीला सुद्धा या गाण्याची भुरळ पडली असून, अभिनेत्रीने या गाण्यावर सुंदर डान्स करत सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.
एप्रिल महिन्याच्या अखेरीस संजू राठोडचं ‘शेकी’ गाणं सर्वत्र प्रदर्शित करण्यात आलं. यापूर्वी संजूच्या ‘नऊवारी’, ‘गुलाबी साडी’, ‘काळी बिंदी’ या गाण्यांनी सोशल मीडियावर रेकॉर्डब्रेकिंग व्ह्यूज मिळवल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे ‘शेकी’ गाण्याकडून सुद्धा सर्वांना प्रचंड अपेक्षा होत्या. अवघ्या महिन्याभरातच ‘शेकी’ गाण्याने जगभरात पसंती मिळवली आहे.
नेटकऱ्यांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण इन्स्टाग्राम रील्सवर संजू राठोडच्या व्हायरल गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील “एक नंबर तुझी कंबर…” म्हणत संजूच्या ट्रेंडिंग गाण्यावर ठेका धरला. अभिनेत्री या व्हिडीओमध्ये जबरदस्त एनर्जीने डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सोनालीने ‘शेकी’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करत, “ट्रेंडिंग विथ ट्रेंड… शेकी-शेकी” असं कॅप्शन दिलं आहे. सोनालीच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. कुशल बद्रिके, नम्रता संभेराव या कलाकारांनी सोनालीच्या डान्स व्हिडीओवर कौतुकास्पद कमेंट्स केल्या आहेत.
याशिवाय नेटकऱ्यांनी सुद्धा अभिनेत्रीच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “अरे वाह! ताई सुंदर डान्स केलात”, “वाह! क्या बात है”, “अमेझिंग डान्स केलात ताई”, “सो-कूल अतिशय छान”, “ऑल टाइम आवडती अभिनेत्री”, “एव्हरग्रीन सोनाली” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या डान्स व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती ‘सुशीला सुजीत’ चित्रपटात झळकली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिनेता प्रसाद ओकने केलं आहे. याशिवाय सोनालीने ‘मानवत मर्डर्स’मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी नुकताच तिचा नामांकित पुरस्काराने सन्मान देखील करण्यात आला आहे.