‘बिग बॉस ओटीटी’चे तिसरे पर्व कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अरमान मलिकने विशाल पांडेच्या कानाखाली मारल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आता मात्र हा शो वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. एका एपिसोडदरम्यान प्रेक्षकांनी असे काही पाहिले आहे की, बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत.

चर्चेत असणाऱ्या व्हिडीओमध्ये लव कटारियाला शिक्षा देण्यात आली आहे. त्याला हातकडी घालून गार्डन परिसरात बसवले आहे. यादरम्यान लव कटारियाच्या मागून साप सरपटत जात असल्याचे दिसत आहे. पण, लव किंवा इतर सदस्याचे सापाकडे लक्ष नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे म्हटले जात आहे. नेटकरी बिग बॉसला याबाबत प्रश्न विचारत असून मेकर्सकडून यावर अद्याप कोणतेही उत्तर आले नाही. हा व्हिडीओ लाइव्ह फीडदरम्यानचा आहे.

लव कटारियाला १२ तासांपासून ही शिक्षा देण्यात आली आहे. विशाल पांडे लव कटारियाला बाहरवाला हा टॅग देईल. त्यानंतर लव कटारिया या शोमध्ये राहणार की बाहेर जाणार हे बिग बॉस ओटीटीचे प्रेक्षक आणि घरातील सदस्य ठरवणार आहेत. बिग बॉस एका सदस्याला बाहरवाला म्हणून निवडणार आहेत आणि घरातील इतर सदस्यांनी बिग बॉसने बाहरवाला म्हणून निवडलेला स्पर्धक कोण हे ओळखायचे आहे. जर या इतर सदस्यांनी अचूक ओळखले, तर जो सदस्य बाहरवाला म्हणून निवडला गेला आहे तो डेंजरझोनमध्ये असणार आहे. आता लव कटारियाला बाहरवाला म्हणून घोषित केले असून तो शोमधून बाहेर पडणार की शोमध्ये कायम राहणार, याबद्दल कोणतीही स्पष्टता दिसत नाही. दरम्यान, लव कटारियाला दिलेले शिक्षेचे स्वरुप पाहता त्यावर नेटकऱ्यांकडून प्रश्न निर्माण केले जात आहेत.

दरम्यान, दिग्गज अभिनेते अनिल कपूर सूत्रसंचालन करीत असलेला हा शो सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. विशाल पांडेने अरमान मलिकची पत्नी क्रितिकाविषयी टिप्पणी केल्यानंतर अरमान मलिकने त्याच्या कानाखाली मारली होती, त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अरमान मलिकची पहिली पत्नी पायलने ‘वीकेंड का वॉर’मध्ये नुकतीच हजेरी लावली होती, त्यावेळी विशाल पांडेच्या वक्तव्यावर तिनेदेखील आक्षेप घेतला होता. दरम्यान, अरमान मलिक स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात आल्यापासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. तो शोमध्ये आल्यानंतर सोशल मीडियावर बहुपत्नीत्वाचा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते.