Rashmi Rocket Movie Review : लक्ष्यवेधी!

‘रश्मी रॉकेट’ हा कोणत्याही खेळाडूचा चरित्रपट नाही हे निर्मात्यांनी चित्रपटाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं आहे.

रेश्मा राईकवार

वास्तव कथा असो वा कुठल्या वास्तव घटनेवरून प्रेरित होऊन रचलेली कथा असो, लोकांपर्यंत आपल्याला नेमकं  काय पोहोचवायचं आहे, याबद्दल स्पष्टता असेल तर कथेतच अर्धी लढाई जिंकता येते. त्या कथेचा गाभा लक्षात घेत दिग्दर्शकीय मांडणी आणि कलाकारांचा अभिनय रंगत जातो. अर्थात हे सगळंच एका चित्रपटात जमून येणं म्हणजे अंमळ अवघडच! क्रीडानाटय़ प्रकाराला हात घालणाऱ्या दिग्दर्शक आकर्ष खुराणा यांनी ‘रश्मी रॉके ट’मधून आपलं लक्ष्य अचूक साधलंय. गेल्या दोन वर्षांत आलेल्या क्रीडापटांच्या लाटेत कथा, दिग्दर्शकीय मांडणी आणि अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट उजवा ठरला आहे.

‘रश्मी रॉकेट’ हा कोणत्याही खेळाडूचा चरित्रपट नाही हे निर्मात्यांनी चित्रपटाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे चित्रपटाची नायिका रश्मीचं रॉके टच्या वेगाने धावणं आणि देशासाठी पुरस्कार जिंकू न आणणं हा या चित्रपटाचा मुख्य कथाविषयच नाही. तरीही या चित्रपटाला वास्तव घटनेचा आधार आहे हे लक्षात घ्यायला हवं. भारतीय धावपटू द्युती चंदला तिच्या शरीरात पुरुष संप्रेरकांचे प्रमाण जास्त असल्याने खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. कायदेशीर मार्गाने याप्रकरणी न्याय मिळवत तिने पुन्हा नव्या जोमाने आपला खेळ सुरू के ला. द्युतीला ज्या कारणास्तव संघर्ष करावा लागला तो ‘रश्मी रॉके ट’ या चित्रपटाचा मुख्य विषय आहे. संप्रेरकांचे प्रमाण जास्त असणे, लिंग चाचणी यामुळे अनेक अ‍ॅथलीट्सची खेळातली कारकीर्द सुरू होण्याआधीच संपली. देशभरात गावखेडय़ातून अनेक जण खूप संघर्ष आणि प्रयत्नांनंतर भिन्न क्रीडा प्रकारांत प्रावीण्य मिळवत राष्ट्रीय स्तरावर येऊन पोहोचतात; पण प्रत्येकालाच पुढे जाता येत नाही. यात मग संबंधित क्रीडा संघटनांचे राजकारण, खेळाडूंचे आपापसातले हेवेदावे अशा अनेक गोष्टी येतात, मात्र लिंगचाचणी किंवा एखाद्या खेळाडूचं समलैंगिक असणं अशा किती तरी गोष्टींचा बाऊ करून, दुरुपयोग करून खेळाडूंची कारकीर्द संपवली जाते. नैसर्गिकरीत्या पुरुष संप्रेरकांचे प्रमाण जास्त आहे म्हणून महिला खेळाडूच्या खेळावर बंदी आणणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न हा चित्रपट उपस्थित करतो. कच्छमध्ये अगदी लहानपणापासून रॉके टच्या वेगाने धावणाऱ्या रश्मीने धावपटू होण्याचे स्वप्न कधीही पाहिले नव्हते. तिने धावपटू व्हावे, ही तिच्या आईवडिलांची इच्छा असली तरी तिच्या मनाला कधी हा विचार शिवला नाही. देशासाठी धावण्यापासून दूर धावणारी रश्मी अखेर महत्प्रयासाने राष्ट्रीय स्तरावर पोहोचते आणि तिचं वाऱ्याच्या वेगाने धावणंच तिच्या यशातला मुख्य अडसर ठरतं.

रश्मीच्या निमित्ताने महिला खेळाडूंना कराव्या लागणाऱ्या संघर्षांपैकी महत्त्वाच्या मुद्दय़ावर हा चित्रपट बोट ठेवतो. वास्तवाकडे लक्ष वेधणाऱ्या या काल्पनिक चित्रपटाची पटकथा अनिरुद्ध गुहा यांनी लिहिली आहे. बांधेसूद कथा, रश्मीचा खेळ जितका महत्त्वाचा तितकाच त्या खेळात अडसर ठरणारा मुद्दाही महत्त्वाचा आहे याचं भान राखत लेखकाने समतोल कथा लिहिली आहे. त्यामुळे कथेशी प्रामाणिक राहत त्यात भडक नाटय़ न आणता विषयाचं गांभीर्य मांडण्याचा दिग्दर्शक आकर्ष खुराणा यांचा प्रयत्नही यशस्वी ठरला आहे. कच्छची पार्श्वभूमी, रश्मीच्या आईची- भानूबेनची कणखर व्यक्तिरेखा, कच्छचं वैराण वाळवंट आणि आकर्षक रंगीबेरंगी संस्कृती, सैन्याचा वावर, पर्यटक या सगळ्याचा उत्तम वापर करत दिग्दर्शकाने कथा रंगवली आहे. एका वळणावर चित्रपट ‘इंडियन अ‍ॅथलीट्स असोसिएशन’नामक प्रांतात शिरतो आणि रश्मीबरोबर आपल्यालाही वेगळं जग खुलं होतं.

चित्रपटाबद्दलची उत्कं ठा कमी होऊ न देता त्यातला विषय नेमके पणाने पोहोचवणं या लेखक – दिग्दर्शकद्वयीला साधलं आहे. त्यात अभिनेत्री तापसी पन्नूने पडद्यामागे घेतलेली मेहनत ही तिच्या शरीरयष्टीपासून देहबोलीपर्यंत सगळ्यातून झळकते. तिचं पुरुषी दिसणं आणि वावर यामुळे चित्रपटाचा विषय सहजी लोकांपर्यंत पोहोचतो. तापसीच्या अभिनयाबद्दल नाव ठेवायला जागा नाही, रांगडय़ा खेळात चित्रपटातल्या हळव्या प्रेमक थेचं हळवेपण बाजूला पडलं आहे; पण तीही बाजू मेजर गगन ठाकू रची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता प्रियांशू पेन्यूलीने उत्तम सांभाळून घेतली आहे. गेल्या काही चित्रपटांतून सातत्याने विनोदी भूमिकांमधून समोर आलेल्या अभिनेता अभिषेक बॅनर्जीने साकारलेला वकीलही वेगळा ठरला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पाठक यांनाही खूप चांगल्या भूमिके त पाहण्याची संधी चित्रपट देतो. न्यायाधीशांच्या छोटेखानी भूमिके त अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनीही लक्ष वेधून घेतलं आहे. अमित त्रिवेदीचं संगीत हीसुद्धा या चित्रपटाची जमेची बाजू ठरली आहे. खेळात रमवणारा, पण आपलं अचूक लक्ष्य साधणारा ‘रश्मी रॉके ट’ क्रीडापटांच्या गर्दीत वेगळा ठरला आहे.

रश्मी रॉकेट

दिग्दर्शक – आकर्ष खुराणा

कलाकार – तापसी पन्नू, प्रियांशू पेन्यूली, अभिषेक बॅनर्जी, सुप्रिया पाठक, सुप्रिया पिळगावकर, मनोज जोशी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rashmi rocket movie review by reshma raikwar zws

ताज्या बातम्या