अभिनेत्री ऐश्वर्या नारकर(Aishwarya Narkar) या त्यांच्या अभिनयासाठी लोकप्रिय आहेत. त्यांच्या सौंदर्यांचेदेखील वेळोवेळी कौतुक होताना दिसते. त्या नुकत्याच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा त्यांची ही भूमिका वेगळी असल्याचे पाहायला मिळाले. नकारात्मक भूमिकेतूनही त्यांनी प्रेक्षकांचे मने जिंकली. अभिनयाबरोबरच ऐश्वर्या नारकर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. विविध रील्स, व्हिडीओ या माध्यमांतून त्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांचे पती अविनाश नारकरदेखील त्यांना अनेकदा साथ देताना दिसतात. या जोडीच्या उत्साहाचे चाहत्यांकडून वेळोवेळी कौतुक होताना दिसते. या सगळ्यात काही लोक ट्रोल करतानासुद्धा दिसतात. आता एका मुलाखतीत ऐश्वर्या नारकर यांनी यावर वक्तव्य केले आहे.

“…तर हे व्यक्तिस्वातंत्र्य आहे”

ऐश्वर्या नारकर यांनी नुकतीच आरपार या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत बोलताना म्हटले, “एक तर विकृती कुठेही म्हटलं तर आहेच आणि तुम्ही समोरासमोर येत नाही. त्यामध्ये कितीही बोलू शकता. समोरच्याचा अपमान करू शकता. म्हणजे ती विकृतीच आहे; ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो. आणि मला असं वाटतं की माझ्या लेव्हलला ट्रोलिंग खूप वाईट असले तरी सेन्सिबल आहेत. काही गे कम्युनिटी आहेत किंवा अशा झोनमधील जे लोक आहेत, त्यांना तर म्हणजे जीव देण्यापर्यंत त्यांचं ट्रोलिंग होतं, हे आपण बघितलं आहे. तर हे व्यक्तिस्वातंत्र्य आहे.”

“एखादी गोष्ट आवडली नाही, तर ती आवडली नाही. म्हणून तुम्ही सांगू शकता. पण, त्याच्यावर तुमचा अधिकार नाहीये. त्यांचं आयुष्य हे त्यांचं आयुष्य आहे. त्याच्या किंवा तिच्या पेजवरून काय दाखवायचं, काय करणार हे तिचं ती ठरवणार आहे. तुम्ही बघून उगाचच त्यावर वाटेल त्या चर्चा करून आणि वाटेल ते मतप्रदर्शन करून समोरच्याचं मानसिक आरोग्य वाया घालवण्याचा तुम्हाला काही अधिकारचं नाहीये. ते खूप चुकीचं आहे. सगळ्यात वाईट भाग हा आहे की, त्यावर अ‍ॅक्शन घेणारा ना कोणता कायदा आहे, ना त्यावर पोलिस डिपार्डमेंट त्यावर काय करू शकतं. सोशल मीडियाचे असे काही कायदे नाहीयेत. फक्त तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता. मी ब्लॉक केलं म्हणून तो माणूस इतरांना बोलायचं कमी करणार नाही. अशी काही पेजेस आहेत, तिथे आपले फोटो वापरले जातात. आम्हाला आपल्या चांगल्या लोकांकडून असे मेसेज येतात की, तुमचे फोटो अशा अशा पद्धतीने अमुक एखाद्या पेजवर वापरले गेले आहेत. त्यावर फार वाईट कोट आहेत किंवा फेस मॉर्फ केला आहे. तर त्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे रिपोर्ट करून, त्याचं एक अकाउंट बंद होईल; पण म्हणून ही विकृती थांबणार नाही. पण, या लोकांच्या बाबतीत आपण काय करू शकतो यावर कलाकारांनी म्हणा किंवा कोणीतरी अशी अ‍ॅक्टिव्हिटी केली पाहिजे. तर हे कुठेतरी थांबू शकेल”, अशा पद्धतीने ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर लोकांना ट्रोल करणाऱ्यांवर, वाईट भाषेत लिहिणाऱ्यांबद्दल मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा: सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऐश्वर्या नारकर आता कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.