Kashmira Kulkarni Reveals Her Hard Time: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मालिकेतील जीवा, नंदिनी, काव्या व पार्थ यांना प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. तितकेच प्रेम नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या रम्यालादेखील मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत रम्याची भूमिका अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने साकारली आहे. आता अभिनेत्री लवकरच वामा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या कठीण काळाबद्दल वक्तव्य केले आहे.

दोन दिवसातून एकदा…

कश्मिरा कुलकर्णीने नुकतीच सकाळ प्रीमिअरला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “माझी गोष्ट सर्वांना माहीतच आहे. मी चार वर्षांची असताना वडिलांचं निधन झालं होतं. अगदी जन्माला आल्यापासून शिक्षणासाठी, खाण्या-पिण्यासाठी संघर्ष करावा लागला. शाळा झाली की रोज काहीतरी काम करायला लागायचं. पण, अगदी पाच-सहा वर्षांची असताना कोणी आपल्याला नोकरीला ठेवत नाही. पण, शेजारी वगैरे अमुक एखादी गोष्ट घेऊन ये, मग मी तुला खायला देईन असं व्हायचं, अशा बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “हॉटेलमध्ये बायका काम करायच्या. तिथे शिल्लक राहिलेल्या गोष्टी त्या डब्यातून घरी घेऊन जातात. त्यांच्याकडून आई १०-१५ रुपयांना डबा विकत घ्यायची, जो दोन दिवसांतून एकदा यायचा; त्यामुळे दोन दिवसातून एकदा जेवायची सवय होती. कारण अन्न तेव्हा मिळायचं नाही.सराफ कट्ट्यातला जन्म, त्यामुळे सगळ्या सोनारांच्या दुकानात जायचं. वर्गणी गोळा करायची. त्यातून शिक्षण पूर्ण केलं. तर प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक टप्प्यावर मी तो संघर्ष पाहिला आहे.

याबरोबरच अभिनेत्री वामा चित्रपटातील तिच्या सरला या भूमिकेबाबत म्हणाली, “प्रत्येक प्रोजेक्ट महत्त्वाचा असतो. पण, यामध्ये माझ्यासाठी वेगळेपण असं आहे की प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष करावा लागतो. आपण बघतो की एखादी महिला दररोज ऑफिसला जाते, पण एकदा का आपल्या बेडरूमचं दार बंद झालं की आतमध्ये तिच्याबरोबर काय गोष्टी घडतात, या सहसा बाहेर येत नाहीत. आल्या तरी फार तर त्या तिच्या आईजवळ, सासूजवळ, बहीण किंवा मैत्रीण इथपर्यंत त्या जातात. पण, जेवढा माझा अनुभव आहे, त्यासु्द्धा इतकंच सांगतात की जाऊ दे, जुळवून घे, स्त्रीचं आयुष्य असंच असतं. पण, मला किंवा सरलालासुद्धा हाच प्रश्न आहे की जुळवून घ्यायचं?”

दरम्यान, अभिनेत्रीने मालिकांबरोबरच चित्रपटातही काम केले आहे. कश्मिरा कुलकर्णीचा मोठा चाहतावर्ग आहे.