Lakshmi Niwas Marathi Serial : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या सिद्धू आणि भावनाची लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. २३ जून ते ३० जून या आठवड्याभरात प्रेक्षकांना मालिकेत सिद्धू-भावनाचा भव्य लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. सिद्धू लग्नानंतर भावनासह आनंदीचा देखील स्वीकार करणार आहे.
लग्नघर असल्याने सध्या मालिकेतील सगळ्या नायिका सेटवर नटून-थटून शूट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. शूटिंगमधून मोकळा वेळ मिळताच यापैकी काही अभिनेत्रींनी जुन्या सुपरहिट बॉलीवूड गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे. सिद्धूची मोठी वहिनी नीलांबरी गाडेपाटीलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कल्याणी जाधवने हा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील अभिनेत्रींनी १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शराबी’ चित्रपटातील “इन्तेहाँ हो गई इंतजार की…” या गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हे गाणं किशोर कुमार व आशा भोसले यांनी गायलं असून बप्पी लहरी या गाण्याचे संगीत दिग्दर्शक होते.
अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रीत झालेल्या “इन्तेहाँ हो गई इंतजार की…” या गाण्याला आता जवळपास ४१ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. सध्या इन्स्टाग्राम रील्सवर हे गाणं तुफान ट्रेंड होत आहे. यामुळेच ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील अभिनेत्रींनी या ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स करत खास व्हिडीओ शेअर केला आहे.
पल्लवी वैद्य ( सिद्धूची आई ), पायल पांडे ( वेंकीची पत्नी ), तन्वी कोलते ( सिद्धूची बहीण सिंचना ), स्वाती देवल ( भावनाची मोठी बहीण ), जान्हवी तांबट ( पूर्वी ) आणि कल्याणी जाधव ( सिद्धूची वहिनी ) या ६ अभिनेत्रींनी मिळून अमिताभ बच्चन यांच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. या सहा नायिकांसह मालिकेतील शांता आजी सुद्धा या व्हिडीओमध्ये थिरकल्या आहेत.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील अभिनेत्रींच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “एक नंबर लय भारी डान्स केला आहे”, “सुपर से उपर डान्स”, “ग्रेट वर्क लक्ष्मी निवास टीम”, “मस्त डान्स केला… मजा आली”, “जलवा आहे तुमचा मस्त डान्स केलात” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी कमेंट्समध्ये दिल्या आहेत.