अभिज्ञा भावे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘खुलता कळी खुलेना’, ‘तू तेव्हा तशी’, ‘रंग माझा वेगळा’, अशा छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अभिज्ञा प्रसिद्धीझोतात आली. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर अभिज्ञा प्रचंड सक्रिय असते. अलीकडेच तिच्या आजीचं निधन झाल्याचं तिने पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. अभिज्ञाचं तिच्या आजीबरोबर फार सुंदर बॉण्डिंग होतं. आजीच्या आठवणीत अभिनेत्रीने नुकतीच एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : “नऊवारी साडी, नाकात नथ अन् पायात…”, ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचा मराठमोळा लूक, नेटकरी म्हणाले, “मराठी…’
अभिज्ञा भावेच्या आजीचं नाव प्रमिला भावे असून त्या ९३ वर्षांच्या होत्या. यापूर्वी आजीबरोबरचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने “मी माझ्या एकमेव सर्वात मोठ्या चाहतीला खूप मिस करेन” असं म्हटलं होतं. आता तिने आजीच्या आठवणीत एक कविता शेअर केली आहे.
अभिज्ञा भावेची पोस्ट…
प्रिय आजी…
माणसाच्या सहवासाची किती सवय लागते नाही?
एक दिवस ती नसेल या विचाराचा विसरच पडतो.
ती असताना नकोशी झालेली बडबड…ती नसताना हवीहवीशी वाटू लागते.
कधीकधी सहवासात खूप वर्ष गेली असं वाटतं
आणि तिच्या नसण्यात एक क्षणही वर्षासारखा वाटू लागतो.
असं वाटतं की, हिच्याशिवाय कसं जगता येईल?
पण, तिचा निरोप घेताच भूक लागते, तहान लागते
एखादा प्रसंग बघून हसूही येतं
तिच्या आठवणींचे गोड गोफ आपण विणू लागतो.
हळूहळू तिच्या आठवणीत रमायला आणि हसायलाही शिकतो.
कधीकधी आश्चर्य वाटतं…
माणूस हा किती विचित्र आहे ना? मी तिच्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणणारा…
ती गेल्यावर तिच्या नसण्यात आपलं असणं शोधायला लागतो.तुझी प्रिय सोनू…
हेही वाचा : “वडापाव खायला पैसे नसायचे”, ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातला आठवले संघर्षाचे दिवस, म्हणाली, “झगमगत्या दुनियेत…”
दरम्यान, अभिज्ञाच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि मनोरंजन सृष्टीतील तिचे मित्रमंडळी कमेंट करत तिच्या आजीला श्रद्धांजली देत आहेत. अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती सध्या ‘बातें कुछ अनकही सी’ या हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.