Ratris Khel Chale Fame Sanjeevani Patil Dance Video : संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. ‘गुलाबी साडी’, ‘काली बिंदी’ या गाण्यांपाठोपाठ संजूच्या ‘शेकी’ गाण्याला सुद्धा रेकॉर्डब्रेकिंग व्ह्यूज मिळाले आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं आणि अवघ्या दोन महिन्यांत या गाण्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातील अनेक कलाकार गेल्या काही दिवसांत ‘शेकी’ गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळालं. इन्स्टाग्राम रील्सपासून ते युट्यूबच्या शॉर्ट्स व्हिडीओपर्यंत सर्वत्र संजूच्या ‘शेकी’ गाण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीला देखील या गाण्याची भुरळ पडली आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील वच्छी या पात्रामुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच संजीवनी पाटील. नुकताच तिने ‘शेकी’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला संजीवनीने, “मी या गाण्यावर डान्स करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही” असं कॅप्शन दिलं आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे अभिनेत्री संजीवनी पाटील घराघरांत लोकप्रिय लोकप्रिय झाली. यामध्ये तिने साकारलेल्या ‘वच्छी’ या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. लॉकडाऊनच्या काळात वच्छीचा डान्स व्हिडीओ सुद्धा सर्वत्र व्हायरल झाला होता. आता प्रेक्षकांच्या याच लाडक्या वच्छीने संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्यावर ‘एक नंबर, तुझी कंबर’ म्हणत जबरदस्त डान्स केला आहे.

संजीवनीच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “एक नंबर मॅम”, “जबरदस्त डान्स”, “वच्छी डान्स” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संजीवनी पाटीलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील वच्छीच्या पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. त्यावेळी वच्छीचा डान्स खूप व्हायरल झाला होता. अजूनही तिच्या डान्सचे मीम्स व्हायरल होतं असतात. या भूमिकेसाठी संजीवनीला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार देखील मिळाला होता. अभिनेत्री काही दिवसांपूर्वीच ‘कलर्स मराठी’च्या ‘लय आवडतेस तू मला’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.